लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर सुरू करा, अशी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर मागणी करूनही त्याची शिवसेनेने अद्याप दखल घेतलेली नाही. उलट शिवसेना व भाजप या दोन पक्षांच्या नेत्यांमध्येच गाठीभेटी सुरू झाल्याने आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे. या पाश्र्वभूमीवर आठवले यांनी रविवारी मुंबईत पक्षाची जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.
गेल्या महिन्यात आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन सेना-भाजपने आरपीआयशी काँग्रेसी वर्तन करू नये, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.  
त्यावेळी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी निवडणुकाबाबत चर्चा केली. त्यावेळी आठवले यांना बोलावले नसल्याने आरपीआच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.वारंवार मागणी करूनही सेनेकडून चर्चेसाठी बोलवणे येत नसल्याने सध्या आरपीआयचे नेते व कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. त्या पाश्र्वभूमीवर रविवारी सायंकाळी कुर्ला येथे आरपीआयची सभा आयोजित करण्यात आली आहे.