लोकसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महायुतीत जागावाटपाबाबत अजून काहीच चर्चा सुरु होत नसल्याने रिपब्लिकन पक्षात अस्वस्थता पसरली आहे. निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली महायुतीची समन्वय समितीही एका बैठकीनंतर गायब झाली आहे. गेल्या दीड-पावणे दोन महिन्यात दुसरी बैठक होणार की नाही, याबाबत कसलीही चर्चा झालेली नाही, असे आरपीआयमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपबरोबर म्हणजेच महायुतीसोबत लढविण्याचा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून जागा वाटपाची चर्चा सुरु करावी, अशी आठवले सातत्याने मागणी करीत होते. परंतु त्याची सेना किंवा भाजपच्या नेतृत्वाने दखलच घेतली नाही. त्यामुळे त्यांनी ऑक्टोबपर्यंत चर्चा सुरु झाली नाही, तर आरपीआयला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर घाईघाईत तीन पक्षाची एक समन्वय समितीती स्थापन करण्यात आली. त्यात शिवेसनेचे सुभाष देसाई, गजानन किर्तीकर, लिलाधर डाके, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आणि आरपीआयतर्फे अविनाश महातेकर, भुपेश थुलकर आणि सुमंतराव गायकवाड यांचा समावेश करण्यात आला. ऑक्टोबरच्या अखेरीस समन्वय समितीची एक घाईघाईत बैठक घेण्यात आली. त्यात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापासून राज्यात संयुक्त मेळावे घेणे, आघाडी सरकारचा भ्रष्टाचार, महागाई व दलितांवरील अत्याच्याराच्या विरोधात आंदोलने करणे असे निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर दर महिन्याला समितीची बैठक घेण्याचेही ठरले होते. परंतु त्यानंतर गेल्या दीड-पावणे दोन महिन्यात एकही बैठक झाली नाही. संयुक्त सभा आणि आंदोलने तर दूरच राहिली आहेत. ्िनवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या तरी, महायुतीत जागा वाटपाची चर्चाच होत नसल्याने आरपीआयमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली आहे.