महायुतीत अजून जागावाटपाबाबत कसलीही चर्चा झाली नसताना शिवसेना व रिपब्लिकन पक्ष यांच्यात लोकसभा मतदारसंघावरुन दबावतंत्राचे राजकारण सुरु झाले आहे. लोकसभेच्या अगदी कमीत कमी जागा आरपीआय मागणार आहे. परंतु त्यातही शिवसेनेच्याच जागांवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे सेनाही अस्वस्थ आहे. त्यामुळेच दक्षिण-मध्य मुंबईतून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नाव पुढे करुन आरपीआयवर दबाव आणण्याचा सेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. तर मुंबईत दोन मतदार संघावर दावा करुन सेनेवरचा ताण वाढविण्याची आरपीआयची खेळी असल्याचे सांगितले जाते.
आठवले यांनी विभागवार बैठका घेऊन लोकसभेच्या कोणत्या जागा लढविण्यासाठी सोयीच्या आहेत, याचा आढावा घेतला. त्यानुसार मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई व ईशान्य मुंबई या दोन जागांवर दावा सांगितला जाणार आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून एकदा आठवले निवडून आले होते, तर ईशान्य मुंबईत त्यांनी तिसऱ्या आघाडीचा उमेदवार असताना सव्वा दोन लाखांच्यावर मते घेतली होती. मात्र आता दक्षिण-मध्य मुंबईतून शिवेसनेतर्फे मनोहर जोशी यांचे नाव पुढे आणल्याने आरपीआयची मोठी पंचाईत झाली आहे. परंतु आरपीआयनेही ही जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी करुन सेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बदल्यात मुंबईतील एखादी जागा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.
मुंबईच्या बाहेर आरपीआयने रामटेक, लातूर, पुणे, कल्याण या जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. त्यातील कल्याण ही तर शिवेसनेची निवडून आलेली जागा आहे. रामटेक हा सेनेला सुटलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे आरपीआयला या जागा सहजासहजी मिळतील, अशी शक्यता नाही. लोकसभा निवडणुकांबाबत महायुतीत अजून कसलीही चर्चा नाही, तरीही मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे सांगून एकमेकांवर दाबाव वाढविण्याच्या खेळीला मात्र सुरुवात झाली आहे.