पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आश्वासन देऊनही खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद न दिल्याने नाराज रिपाइंने आता भाजपशी असहकार पुकारण्याचे ठरविले आहे. राज्यात वाढते जातीय अत्याचार व इंदू मिलच्या प्रश्नावर २८ नोव्हेंबरला मोर्चा काढून त्याची सुरुवात केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी पहिला विस्तार झाला. भाजपबरोबर युती करणाऱ्या रिपाइंचे नेते आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन खुद्द मोदी यांनी २४ मे २०१४ रोजी दिले होते, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली. मात्र भाजपकडून ते पाळले गेले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, हे खरे मात्र आठवलेंमुळे जातीयवादाच्या आरोपातून भाजपला मुक्त होता आले, त्यामुळेच आज त्यांच्याशी युती करायला शरद पवारांनाही संकोच वाटत नाही, त्याची जाण म्हणून तरी मंत्रिपदाचा विचार करायला हवा होता, याकडे महातेकर यांनी लक्ष वेधले.
केंद्रातील व राज्यातील नव्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर आठवले यांच्या उपस्थितीत सोमवारी व मंगळवारी झालेल्या बैठकीत यापुढे भाजपकडे काही मागायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. एक प्रकारे भाजपशी असहकार पुकारण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले. राज्यात वाढत्या दलित अत्याचाराच्या व इंदू मिलच्या जमिनीच्या प्रश्नावर येत्या २८ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी रिपाइंने केली आहे.