महाराष्ट्राचे विभाजन करण्यास शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही शिवशक्ती-भीमशक्तीच्या नावाने राजकीय जुळवाजुळव करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे तर, पक्षाच्या वतीने २४ फेब्रुवारीला विदर्भात जनआंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकृपेने खासदार झालेल्या रामदास आठवले यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या भाजपच्या सुरात सूर मिसळला आहे.
आंध्रातील जनतेचा विरोध असताना, इतकेच नव्हे तर, कॉंग्रेसचाही विरोध असताना केंद्रातील युपीए सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याचे विधेयक संसदेत मंजूर करुन घेतले. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीलाही पुन्हा जोर येऊ लागला आहे. राज्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव करण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने जोरदार तयारी चालविली आहे. महायुतीत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर सहभागी झाले आहेत. मात्र महायुतीतील घट पक्षांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत.
शिवेसनेचा वेगळ्या विदर्भ राज्याला विरोध आहे. किंबहुना महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, असा इशारा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. भाजपचे वेगळ्या राज्याला समर्थन आहे. रिपब्लिकन पक्षानेही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने तेलंगणाप्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. या प्रश्नावर विदर्भात पक्षाच्या वतीने २४ फेब्रुवारीला जनआंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भला विरोध असला तरी रिपाईचा पाठिंबा आहे, असे आठवले म्हणाले. अर्थात या मुद्यावरुन महायुतीत फूट पडणार नाही, असा दावाही त्यांनी