या महिन्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे जवळपास नक्की झाले आहे. त्यात घटक पक्षांनाही प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. मात्र खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचा दोन राज्य मंत्रिपदे मिळावीत, असा प्रयत्न सुरु आहे.
रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले आहे, परंतु त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी आणखी एक राज्य मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचा व त्यावर एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. भाजपने विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्ष या मित्रपक्षांना सत्तेत योग्य वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता त्याची पूर्तता करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सूतोवाच केले होते. त्यानंतर शुक्रवारी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व त्यात मित्रपक्षांना स्थान दिले जाईल, असे जाहीर केले आहे.
रिपब्लिकन पक्षात मंत्रिपदावरून अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये चुरस आहे. त्याचवेळी राज्य मंत्रिपदासाठी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांचे नाव पुढे आले आहे. त्यावरून पक्षातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षात फूटही पडण्याची शक्यता कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आणखी एक राज्य मंत्रिपद मिळवून घेऊन त्यावर एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लावून पक्षातील असंतोष दूर करावा, असा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.