करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यानुसार, मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात १ हजार रुपये दंड आकारण्याची घोषणा कालच करण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ प्रभावाने त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. यासाठी पोलिकेने शहरभर काही मार्शल्स तैनात केले आहेत. दरम्यान, काल एकाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १११ जणांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून दंडापोटी १ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले, “गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यानं आजाराचा फैलाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं हे थांबवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत. सुरुवातीला सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येत होता. तो आता १००० रुपये करण्यात आला आहे. दंड वाढवल्याने लोक खुल्या जागी थुंकताना विचार करतील.” बुधवारी संध्याकाळपर्यंत थुंकणाऱ्या १११ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांच्या दंडाची वसूली करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मर्यादित कालावधीसाठी दुकानं उघडण्यास परवानगी

मुंबईमध्ये दुकानं उघडणे आणि बंद करण्याचा एक निश्चित कालावधी ठरवण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला देण्यात आला आहे. सरकारने दुकानदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी दुकानं उघडणं आणि बंद करण्याची वेळ स्वतःच निश्चित करावी. मात्र, मेडिकल, दूध, खाद्य पदार्थ, भाजी, किराना दुकांनांसाठी हा नियम लागू नाही.