वरळी, परळमधील पुलांच्या दुरुस्तीला विलंब

मुंबई : सुमारे दोन वर्षांपूर्वी कार्यादेश दिल्यानंतरही वेळीच कामे सुरू न झाल्यामुळे वरळी, परळ, वडाळा, शीव येथील उड्डाणपूल, तसेच रेल्वेमार्गावरील पुलांच्या दुरुस्तीच्या खर्चात तब्बल १० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. करोनामुळे उत्पन्नात घट झालेली असताना आता पालिके ला या १० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. या कामांचा खर्च १७ कोटी २६ लाखावरून २७ कोटींवर गेला आहे.

महापालिके च्या पूल विभागाने मुंबईतील काही जुन्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्याकरिता फे ब्रुवारी २०१९ मध्ये कार्यादेशही देण्यात आले होते. या कामांसाठी १७ कोटी २६ लाख रुपये खर्च करण्यात येणार होते.  पावसाळ्यासह १५ महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण करण्याची अट निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात मार्च २०१९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पुलाचा काही भाग कोसळला आणि पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे मुंबईतील सर्वच पुलांचे पुन:सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यावेळच्या आयुक्तांनी दिले होते. त्यातच दहिसरमध्ये स्कायवॉकचा भाग रस्त्यावर पडल्यामुळे खळबळ उडाली. परिणामी, मुंबईतील सर्वच स्कायवॉकचे सर्वेक्षण करण्याचे काम व्हीजेटीआयला देण्यात आले. त्यांच्या शिफारशीनुसार  मूळ कामाचा खर्च आणि व्याप्ती वाढली असे पूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच या पुलांच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात के ल्यानंतर वाढीव कामे करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या खर्चात आणखी वाढ होण्याची अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त के ली आहे.

या पुलांची दुरुस्ती

हिंदमाता उड्डाणपूल, प्रभादेवी स्थानकावरील पूल, हाजीअली भुयारी मार्ग, लव्हग्रोव्ह पंपिंग येथील नाल्यावरील पूल, क्लीव्हलॅण्ड बंदर येथील नाल्यावरील पूल, कॉटन ग्रीन स्टेशन येथील पादचारी पूल, सायन स्थानकाजवळील स्कायवॉक, पूर्व द्रुतगती मार्ग उड्डाणपूल, कॉटन ग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉक, परेल टीटी उड्डाणपूल, आप्पासाहेब मराठे मार्ग पादचारी पूल

’ मूळ किं मत : १७ कोटी २६ लाख २८ हजार ७२६ रुपये

’ वाढलेला खर्च  : ९ कोटी ९७ लाख ७४ हजार ६७१ रुपये

’ सुधारित किं मत : २७ कोटी ५९ हजार ३८६ रुपये