मुंबईमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात पहिली मोनोरेल धावण्यासाठी सज्ज असून स्थानिक प्रशासनाने मोनोरेल स्थानकांच्या परिसरात वाहतुक सुरळीत चालावी यासाठीच्या उपाययोजनांवर १६ कोटी रूपय़े खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर पहिली मोनोरेल धावणार आहे.
चेंबूर-वडाला कॉरिडोरमधील ८.३ किलोमीटर परिसरातील सात स्थानकांच्या परिसरात एमएमआरडीए दुचाकी आणि सायकलींसाठी पार्कींगचीही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याचप्रमाणे रिक्षा स्टॅंडसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मोनोरेलचा मार्ग काही ठिकाणी अतिशय अरूंद असून आम्ही या मार्गावर दुहेरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याचा उपयोग पार्कींग आणि रिक्षा स्टॅंडसाठी करता येऊ शकतो. कॉरिडोर अतिशय अरूंद असल्याने मोनोरेल परिसरात आम्ही चार चाकी पार्कींगचा विचार करत नाही आहोत, अशी माहिती एमएमआरडीएच्या अतिरिक्त मेट्रोपोलिटन आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.   
चेंबूर-वडाळा मोनोरेल भक्ती पार्क, म्हैसूर कॉलनी, वी.एन.पुरव मार्ग, फर्टीलायझर कॉलनी आणि आर.सी. मार्ग या स्थानकांवर थांबेल.
वाहतुक व्यवस्था, कुंपण घालणे, दिशादर्शक बसविणे आणि अतिक्रमणे हटविणे व विविध एजन्सीसोबत समन्वय साधण्यासाठी विकासकांनी विविध कंपन्यांकडून अर्ज मागविले आहेत. एमएमआरडीएने बीएमटी, बेस्ट आणि वाहतूक पोलिसांसोबत या उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली आहे.
मेट्रो स्थानकांप्रमाणेच मोनोरेल स्थानकांच्या परिसरातही ‘नो पार्कींग’ चे फलक लावण्यात येणार आहेत. आर.सी.मार्ग आणि चेंबूर परिसरातील काही ठिकाणांची यासाठी चाचपणी करण्यात आली असून तेथील अतिक्रमणे हटवावी आणि पदपथ बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.
गेले सहा-सात महिने आम्ही यावर काम करत आहोत. मुंबईच्या विकासाबाबतचे प्रेझेंटेशन आम्ही राज्य विकास कमिटीकडे दिले असून त्याला मुख्य सचिवांची मान्यताही मिळाली असल्याचं भिडे म्हणाल्या.