मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १८ जण ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी आता ढिगारा उपसण्याचं आणि मदत करण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, यातील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मालाडजवळच्या कुरार भागात भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली. दरम्यान, मुंबईत ठिकठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सर्व भागातील पंप सुरु असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच जोरात पाऊस सुरु असेल तर शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्लाही त्यांनी मुंबईकरांना दिला आहे. तसेच जर कोणाला मदतीची गरज असेल तर महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत मोठा पाऊस झाल्यानंतर अंधेरी, माहूर आणि हिंदमाता या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी उपययोजना केल्या जात आहेत. माहूरचे पंपिग स्टेशन पुढील वर्षापर्यंत कार्यन्वीत होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दोन दिवासांपासून मुंबईत सुरु असलेल्या संततधार पाऊस पाहिल्यास अशा पावसाचा कोणीही निचरा करु शकत नाही. मात्र, त्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पूर्वीप्रमाणे पावसाचे दिवस आता कमी झालेत मात्र, त्याची कोसळण्याची क्षमता वाढलीय. काल रात्रभर पाऊस चालू होता त्यामुळे मुंबईची आज ही परिस्थिती झाली आहे. यावरुन हेच लक्षात आलं की दहा वर्षात जो पाऊस झाला त्यापेक्षा अधिक पाऊस दोन दिवसांत झाला आहे. त्याचबरोबर पाऊसच मोठा असल्याने नाले सफाईवरुन राजकारण करु नका, उलट मुंबईकरांच्या मदतीसाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, हाच संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बैठकीला आदित्य ठाकरे पोहोचले उशीरा

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक लोक अडकून पडले आहे. मुंबईच्या याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एकत्रित माहिती घेणार होते. मात्र, आदित्य ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने त्यांना वेळेवर बैठकीला उपस्थित राहता आले नाही. दरम्यान, आदित्य ठाकरे यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षात यायला उशीर होत असल्याने काही काळ मुख्यमंत्र्यांनी त्यांची वाट पाहिली मात्र, ते तरीही पोहोचू न शकल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून मुंबईच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि ते निघून गेले.