मुंबई महापालिकेचा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय

मुंबई: करोनाच्या लढाईत सेवा देताना बाधा होऊन मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेच्या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. १ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ही योजना लागू राहील. राज्य सरकारच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे.

मुंबईत सेवा देणारे पालिका कर्मचारी मोठय़ा प्रमाणावर बाधित होत आहेत. केवळ आरोग्यच नव्हे तर सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, अभियंते, शिपाई, करनिर्धारण अशा इतर विभागांतील कामगारांचा करोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कर्मचारी बाधित झाले असून ३० हून अधिक कर्मचारी बळी गेले आहेत. मात्र असे असूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नक्की किती नुकसानभरपाई मिळणार ते पालिकेने अद्याप जाहीर केले नव्हते. राज्य सरकारच्या वित्त विभागाने सानुग्रह साहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासकीय उपक्रम यांना २९ मे रोजी दिले. त्यानुसार पालिकेने ही योजना जाहीर केली आहे.

करोनाबाबत सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार/कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य़ स्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी/ तदर्थ/ मानसेवी कर्मचारी यांचा कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य लागू असेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी ही योजना लागू असेल.

पालिकेचे निकष

* बाधित कामगार, कर्मचारी हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असणे आवश्यक

* ज्या प्रकरणांमध्ये कोविडची चाचणी झालेली नसेल किंवा चुकीच्या निगेटिव्ह अहवालाची शक्यता वाटत असेल, त्या प्रकरणांमध्ये महानगरपालिकेची सर्व अधिष्ठातांची समिती सर्व पडताळणी करून अंतिम निर्णय घेईल.

* १ मार्च ते ३० सप्टेंबर कालावधीसाठी योजना लागू.

* नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य़ स्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही साहाय्य

* कोविडबाधित कामगार/कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार