News Flash

विनाहेल्मेट गाडी चालवल्यास आता ५०० रुपये दंड, दिवाकर रावतेंचा नवा आदेश

गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास १००० रुपये दंड

काही दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असा आदेश काढणारे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी नवा आदेश काढला असून, त्यामध्ये दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे विनाहेल्मेट गाडी चालवल्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येईल. दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली.
मोटार वाहन कायद्यातील कलम २०० अनुसार राज्य सरकार नियमभंग केल्याबद्दल वाहनचालकांकडून तडजोड शुल्क रुपात दंड आकारू शकते. या दंडाची रक्कम आतापर्यंत किरकोळ असल्यामुळे वाहनचालक नियम पाळत नाहीत. त्यामुळे दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रावते यांनी निवदेनात म्हटले आहे. त्याप्रमाणे विनाहेल्मेट गाडी चालवणे, गाडी चालवताना लायसन्स न बाळगणे, वाहतूक पोलिसांच्या आदेशांचे पालन न करणे या स्वरुपाच्या नियमभंगासाठी आता ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. तर गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावणे, रिफ्लेक्टर्स न लावणे, अतिवेगाने वाहन चालवणे, टेललॅम्प नसणे, विनानोंदणी दुचाकी वाहन चालवणे या स्वरुपाच्या गुन्ह्यांसाठी यापुढे १००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
त्याचबरोबर वाहनांची शर्यत लावणे, विनानोंदणी चारचाकी वाहन चालवणे या स्वरुपाच्या गुन्ह्यांसाठी २००० रुपये दंड आकारण्यात येईल, असे दिवाकर रावते यांनी निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 5:35 pm

Web Title: rs 500 fine for without helmet driving in maharashtra
Next Stories
1 महाड दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारकडून १० लाखांची मदत
2 महाड दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी, रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधू – मुख्यमंत्री
3 ‘लोकसंख्या जास्त झाल्याने आपल्याकडे माणसांच्या मरणाची किंमतच राहिलेली नाही’
Just Now!
X