ऑक्टोबर २०१४ पासून ७.०३ लाखांहून अधिक रकमेची थकबाकी

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिल येथील ‘वर्षां’च्या पाणीपट्टीचे प्रकरण ताजे असतानाच आता सरकारने याच बंगल्याचा मालमत्ता करही थकल्याचे उजेडात आले आहे. शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजे ऑक्टोबर २०१४ पासून मार्च २०१९ पर्यंतचा ‘वर्षां’ निवासस्थानाचा सुमारे सात लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला नाही.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजप – शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि त्यापाठोपाठ भाजपनेही ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते.  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मालमत्ता करमाफीची घोषणा केली. मात्र मालमत्ता कराच्या देयकामधील केवळ सर्वसाधरण कर माफ झाला आहे. मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या अनेकांवर पालिकेने नोटीस बजावली असून कर वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांतच ते मलबार हिल येथील ‘वर्षां’ निवासस्थानी वास्तव्यासाठी आले.

‘वर्षां’ निवासस्थानाच्या क्षेत्रफळानुसार वर्षांकाठी मालमत्ता करापोटी राज्य सरकारकडून पालिकेच्या तिजोरीत एक लाख ६३ हजार १४४ रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे. पालिका दर सहा महिन्यांनी मालमत्ता कराची देयके जारी करीत असते. पालिकेने ऑक्टोबर २०१४ पासून ऑक्टोबर २०१८ या काळात मालमत्ता कराची नऊ देयके जारी केली. मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून आजतागायत ‘वर्षां’ निवासस्थानाचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमाच करण्यात आलेला नाही. २०१४ या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांचा मालमत्ता कर भरण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कर भरण्यातच आलेला नाही.

२०१४ पासून २०१८ पर्यंतच्या काळातील मालमत्ता करापोटी ७ लाख ३ हजार १४६ रुपये थकले आहेत. त्याशिवाय चालू आर्थिक वर्षांतील कर भरणा झालेला नाही.

‘वर्षां’ची मालमत्ता कराची थकबाकी

कालावधी                                  रुपये

ऑक्टोबर २०१४ ते मार्च २०१५    ५०,५७०

एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५    ८१,५७२

ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१६    ८१,५७२

एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०१६    ८१,५७२

ऑक्टोबर २०१६ ते मार्च २०१७    ८१,५७२

एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७    ८१,५७२

ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८    ८१,५७२

एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८    ८१,५७२

ऑक्टोबर २०१८ ते मार्च २०१९    ८१,५७२

एकूण                                          ७,०३,१४६