‘समाजमाध्यमांपासून जपून राहा,’ असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर काही दिवसांतच भाजपची मातृसंस्था असलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या कार्यकर्त्यांनीही हळूहळू या माध्यमातून मोदी प्रचाराचा आक्रमक पवित्रा आवरता घेण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकसारख्या माध्यमांवरील मोदीविरोधकांचा आक्रमक प्रचार आणि समर्थकांची आक्रमक प्रत्युत्तरे यांमुळे समाजात वैचारिक वैर वाढत असल्याने, संघ स्वयंसेवकांनी मोदीविरोधी प्रचाराला प्रत्युत्तर देण्यापासून दूर राहावे, असा संदेश संघ कार्यकर्त्यांच्या वर्तुळात समाजमाध्यमांद्वारेच फिरू लागला आहे.
‘सध्या सरकारच्या विरोधात नोटाबंदी, जीएसटी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती व महागाईवरून रान पेटविले जात असले तरी त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. काही संघ स्वयंसेवक भाजप सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी भूमिका बजावत असून यापुढे असे करणे टाळावे व संपूर्ण हिंदू समाज हेच आपले एकमेव श्रद्धास्थान मानावे. जात, पात, प्रांत, पक्ष यांचा विचार न करता जो जो हिंदू तो तो बंधू या विचाराशी अविचल राहून समाजात कटुता निर्माण होईल असे प्रसंग टाळावेत,’ असे आवाहन या संदेशाद्वारे करण्यात आले आहे. संघाने हा संदेश अधिकृतरीत्या प्रसृत केलेला नसला, तरी संघ परिवारातील कार्यकर्त्यांना ‘व्हॉट्सअप’वरून हा संदेश सर्वदूर पोहोचला आहे. अलीकडे त्याचे प्रतिबिंब फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर दिसू लागले असून मोदीविरोधी प्रचारास आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा सपाटा थंडावला आहे.
सन २०१९ मध्ये देशातील जनता सरकारच्या विरोधात मते देतील असे आपणास वाटत असेल, तर तो देशातील जनतेचा कौल असेल, त्यामुळे अशा बाबींमुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही, सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे, साध्य नव्हे, आणि फक्त सत्तेत राहूनच असे परिवर्तन होते असे मानू नये. सरकार केवळ सत्तेच्या माध्यमातून परिवर्तनाचे काम करीत असून जेव्हा देशातील बहुसंख्य समाजाला स्वच्छतेचे महत्त्व समजेल तेव्हा परिवर्तन होणारच आहे, असेही या संदेशात म्हटले आहे.
आपण समाजाच्या परिवर्तनासाठी काम करावे, आपण ज्या शाखेचे स्वयंसेवक आहोत, त्या शाखांमधून समाजपरिवर्तनाचे व समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. शाखा हेच समाजपरिवर्तनाचे साधन व केंद्र असावे. सरकार आपले काम करेल, संघ स्वयंसेवकांनी आपले काम करीत राहावे, असा संदेशही याद्वारे संघ कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. काही महिन्यांपासून समाजमाध्यमांवर मोदीसमर्थक आणि मोदीविरोधक यांमध्ये आरोपयुद्ध सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2017 4:31 am