एअर इंडियाची विक्री आणि कॅशलेस अर्थव्यवस्था हे नरेंद्र मोदी सरकारचे दोन निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटलेले नसून या मुद्यावरुन सोमवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर दिला आहे. एअर इंडियाचे नियंत्रण भारतीय कंपनीकडेच असले पाहिजे, एअर इंडियाचा ताबा परदेशी कंपनीला देऊ नका असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या एअर इंडियाचे केंद्र सरकारला खासगीकरण करायचे आहे. या मुद्यावर बोलताना भागवत म्हणाले कि, एअर इंडियाचा कारभार व्यवस्थित चालवला जात नाहीय पण जो कोणी हा कारभार व्यवस्थित चालवू शकेल त्याच्याकडे एअर इंडियाचा ताबा दिला पाहिजे. पण ती भारतीय कंपनीच असली पाहिजे. भारताने आपले आकाश परदेशी कंपनीला देऊ नये. एअर इंडियाकडे अनेक मालमत्ता असून त्याचे जतन केले पाहिजे असे भागवत म्हणाले.

ते मुंबई शेअर बाजारात एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कॅशलेस अर्थव्यवस्थेची संकल्पनाही मोहन भागवतांनी फेटाळून लावली. रोख रक्कमेचा वापर कमी करण्याचे लक्ष्य आपण ठरवू शकतो. पण संपूर्णपणे कॅशलेस होणे जमणार नाही. आज या देशात अनेक लोक आहेत ते संपूर्णपणे कॅशलेस व्यवहार करु शकत नाहीत. कॅशलेस व्यवस्था समजून घेण्यात ऊर्जा घालवणे त्यांना परवडणार नाही असे भागवत म्हणाले.

मोहन भागवंतांनी या कार्यक्रमात आर्थिक प्रगतीचे मुल्यमापन करणाऱ्या जीडीपीलाही विरोध केला. जीडीपी ही परदेशी संकल्पना असून त्यामधून खऱ्या अर्थाने आर्थिक कामगिरीचे मुल्यमापन होत नाही. निती आयोगाने त्याऐवजी दुसरी एखादी संकल्पना सुचवावी असे मत त्यांनी व्यक्त केले. आज अनेक देशांनी जीडीपीची संकल्पना फेटाळून लावली आहे. भूतानमध्ये आनंदी राहण्याच्या निर्देशांकावर प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. भारतात ते योग्य ठरणार नाही पण आपल्या प्रगतीचे मुल्यमापन करण्यासाठी आपण वेगळी व्यवस्था तयार केली पाहिजे असे भागवत म्हणाले.