दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘मंगेशकर कुटुंबीयांना देवाने दिलेली कलेची देणगी त्यांनी कायम समाजहितासाठी वापरली. दीनानाथ मंगेशकर यांच्या गाण्यांतून समाजाच्या वीरतेला प्रोत्साहन मिळते. त्यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी आहे’, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानद्वारे संगीत, नाटय़, कला आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने गौरवले जाते. षण्मुखानंद सभागृहात बुधवारी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात भागवत यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही उपस्थित होते.

अभिनेता आणि पटकथा लेखक सलीम खान यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी लेखक वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी अभिनेत्री हेलन आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. शास्त्रीय नर्तक सुचेता भिडे-चाफेकर यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. भद्रकाली प्रोडक्शनचे ‘सोयरे सकळ’ या नाटकाला ‘मोहन वाघ पुरस्कारा’ने आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी तालयोगी आश्रमाचे पंडित सुरेश तळवलकर यांना ‘आनंदमयी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल विजयकुमार यांना भारतीय जवानांसाठी सामाजिक कार्य करणारी संस्था ‘भारत के वीर’साठी पुरस्कार देण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतर या पोर्टलवर शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सव्वादोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली.  पुरस्कार सोहळ्यात मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने एक कोटी १८ लाख रुपये शहिदांसाठी विजयकुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.