संदीप आचार्य
मुंबई: महाराष्ट्र सरकारने करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन प्राचीन आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी औषधांचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करण्याच्या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवल्यानंतर मुंबईत महानगर विभागात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ने तब्बल सहा लाख घरांमध्ये होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधांचे वाटप केले.

जगभरात करोनाची लागण लक्षावधी लोकांना झाली असून आतापर्यंत लाखो लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारतातही करोनाने लोक त्रस्त झाले असून महाराष्ट्रात त्यातही मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात जवळपास ९४ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास ५२ हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. आगामी पंधरा दिवसात आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी करोना रुग्णांवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी जोरात लावून धरली होती. यातील बहुतेक डॉक्टरांचे म्हणणे होते आमच्या औषधांचा फायदा रुग्णाना किंवा संभाव्य रुग्णामधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत करतो.

कोणतेही साईड इफेक्ट या औषधांना नसल्याने ती देण्यात यावी. ‘आयुष’ नेही करोना रुग्णांना होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे द्यावी, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. करोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. डॉ. तात्याराव लहाने यांच्या समितीने करोना रुग्ण तसेच संभाव्य रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने होमिओपॅथी व आयुर्वेदिक तसेच युनानी औषधे देता येतील असे आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच यातून करोना रुग्णांना बरे करतो असा कोणताही दावा केला जाणार नाही हेही स्पष्ट केले आहे.

शासनाने होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे करोना रुग्णांना तसेच लक्षणे नसलेल्यांना देण्यास मान्यता दिल्यानंतर ‘राष्ट्रीयीकरण स्वयंसेवक संघाने’ आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक काढे घराघरात वाटण्याची योजना तयार केली. त्यानुसार मुंबईतील विविध सोसायटी, चाळी तसेच गरीब वस्त्यांमधे जाऊन संघाच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधून कोणाला ही औषधे हवी आहेत याच्या याद्या तयार केल्या. याबाबत संघाचे मुंबई प्रमुख संजय नगरकर म्हणाले, मुंबईत संघाचे १६ विभाग आहेत. प्रत्येक भागातून कार्यकर्त्यांनी माहिती गोळा केली व त्यानुसार सुमारे सहा लाख घरात अर्सेनिक अल्बम औषध तसेच आयुर्वेदिक काढे यांच वाटप केल्याचे संजय नगरकर म्हणाले. आमच्या माध्यमातून वेगवेगळी सामाजिक कामे सुरु असून मुंबई, ठाणे, कल्याण तसेच नवी मुंबईतून आपल्या गावे जाणाऱ्या स्थलांतरितांना रोज दहा हजाराहून अधिक जेवण देण्याचे कामही आमचे कार्यकर्ते करत आहेत, असेही ते म्हणाले. होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे करोनाच्या संभवित रुग्णांसाठी निश्चित उपयुक्त ठरतील असा विश्वासही नगरकर यांनी व्यक्त केला.