करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील, राज्यातील सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. दरम्यान, यामुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या अनेक कामगारांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. रा. स्व. संघाच्या माध्यमातून ‘अन्नपूर्णा’ योजनेद्वारे १७ कम्युनिटी किचनमधून मुंबई महानगराच्या २४ प्रभागांतील एक लाखांहून अधिक लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका ‘अन्नपूर्णा’ योजनेच्या कम्युनिटी किचनमधून दररोज ४० हजार जेवणाची पाकिटे पालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस असे अत्यावश्यक सेवेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वितरित करीत आहे. तसेच निराधार, गरजू व लॉकडाउन मुळे अडकलेल्या कामगारांनाही दोन वेळचे भोजन वितरित करण्यात येत आहे. अन्नपूर्णाच्या माध्यमातून ६० हजारांहून अधिक जेवणाची पाकिटे बिगर शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने गरीब कुटुंबांना वितरित करण्यात आल्या आहेत. तर सुमारे २० हजार जेवणाची पाकिटे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना वितरित करण्यात आली आहेत.

दोन वेळच्या जेवणाचं वितरण
संघाच्यावतीने सामूहिक प्रयत्नातून ही कम्युनिटी किचन्स चालविण्यात येत आहेत. तसंच श्रमदान, किराणा माल पुरवणे, रोख देणगी अशा विविध माध्यमातून ही कम्युनिटी किचन्स चालविण्यात स्वयंसेवकांकडून योगदान देण्यात येत आहेत. स्वयंसेवकांद्वारे सकाळी आणि संध्याकाळी हे अन्न वितरणासाठी महानगरपालिका अधिकारी आणि वितरकांकडे हस्तांतरित करण्यात येते. तब्बल ७ हजार संघ स्वयंसेवक स्वयंपाक आणि वितरणाच्या कामात सहभागी झाले आहेत.