शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरात महिलांना असलेल्या प्रवेश बंदीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(आरएसस) ‘ऑर्गनायझर’या मुखपत्रातून समर्थन करण्यात आले आहे.त्याचवेळी या वादावर संवादाच्या माध्यमातून पुढे जायला हवे, असा सल्लाही ‘ऑर्गनायझर’मधून देण्यात आला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात बुद्धीवाद्यांनी ब्रिटीश सरकार कायद्यांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचे समर्थन केले होते. पण दुसऱयाबाजूला लोकमान्य टिळकांनी त्यास विरोध केला होता. संवादाच्या माध्यमातूनच बदल व्हायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता. त्याचप्रमाणे शनीशिंगणापूर वादातही तोडगा काढला गेला पाहिजे, असे ‘ऑर्गनायझर’च्या लेखात नमूद करण्यात आले आहे.

शनीच्या चौथऱयावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणाऱया भूमाता ब्रिगेडवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे. ज्या देवावर तुमची श्रद्धाच नाही त्या देवाची जबरदस्तीने पुजा करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा की ज्यांची देवावर श्रद्धा आहे त्यांच्या भावनांचा आदर करायचा हे तुम्हाला ठरवावे लागेल, असा टोला ‘ऑर्गनायझर’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.