राजकीय गदारोळावर संघाच्या मुखपत्राचा सवाल

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केल्याने जोरदार चर्चा झडू लागल्या असून राजकीय पक्षांच्या तंबूंमध्येही चलबिचल दिसू लागली आहे. मात्र, सन्माननीय व्यक्तींना संघाच्या मंचावर निमंत्रित करण्याची प्रथा जुनीच असताना, मुखर्जी यांना निमंत्रित केल्याने एवढी चलबिचल का, असा सवाल ‘ऑर्गनायझर’ या संघ परिवाराच्या मुखपत्राने केला आहे.

येत्या ७ जून रोजी नागपूर येथे संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभास मुखर्जी यांना प्रमुख पाहुणे म्हणून संघाने निमंत्रित केले आहे. देशभरातून ७०९ संघ कार्यकर्त्यांनी या वर्गास हजेरी लावली आहे. मुखर्जी यांनी या समारोप समारंभाचे निमंत्रण स्वीकारल्यापासून राजकीय क्षेत्रात त्याचे जोरदार पडसाद उमटू लागले. त्यांनी आपल्या राजकीय संस्कृतीपासून फारकत घेतल्याची टीकाही सुरू झाली. मात्र, अशा कार्यक्रमात सार्वजनिक जीवनातील विख्यात व्यक्तींना निमंत्रित करण्याची संघाची १९३० पासूनची प्रथा असल्याने मुखर्जी यांना निमंत्रित केल्याचा एवढा गदारोळ का, असा सवाल ‘ऑर्गनायझर’मधून करण्यात आला आहे. संघाच्या याच मंचावर वर्धा येथे महात्मा गांधी यांनी १९३४ मध्ये हजेरी लावली होती, असा दाखलाही या मुखपत्रातील लेखात देण्यात आला आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे हयात असताना वर्धा येथील संघाच्या शिबिरात आपण गेलो होतो, व तेथील शिस्तीने आपण प्रभावित झालो होतो. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या शिबिरात कोठेही आपल्याला अस्पृश्यतेचे नामोनिशाण आढळले नाही, असे महात्माजींनी १६ सप्टेंबर १९४७ रोजी पुन्हा संघ स्वयंसेवकांसमोर बोलताना सांगितले होते, असा दावाही या लेखात करण्यात आला आहे.

संघाने याआधी सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन, जयप्रकाश नारायण यांनाही संघाने या मंचावर निमंत्रित केले होते व त्यांनी संघकार्याची प्रशंसा केली होती, असेही ‘ऑर्गनायझर’ने म्हटले आहे. जनरल करिअप्पा यांना १९५९ मध्ये मंगलोर येथील संघ शिबिरात निमंत्रित करण्यात आले होते व त्यांनी संघाच्या कामाची प्रशंसा केली होती. १९६२ मधील भारत-चीन युद्धकाळातील संघ स्वयंसेवकांच्या अथक मदत कार्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रितही केले होते व तीन हजारांहून अधिक संघ स्वयंसेवकांनी त्या संचलनात भाग घेतला होता. पुढे १९६५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर यांनाही निमंत्रित केले होते, असेही या लेखात म्हटले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षांत कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारकाच्या उभारणीकरिता सर्वपक्षीय पाठिंबा मिळविण्यासाठी रा. स्व. संघाने मोहीम हाती घेतली होती व त्या काळात या प्रकल्पास पाठिंबा देणाऱ्या निवेदनावर एकनाथजी रानडे यांनी ३०० सर्वपक्षीय संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या मिळविल्या होत्या. १९७७ मध्ये आंध्र प्रदेशातील चक्रीवादळात संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवाकार्याबद्दल सवरेदयी नेते प्रभाकर राव यांनी, ‘आरएसएस म्हणजे, रेडी फॉर सेल्फलेस सव्‍‌र्हिस’ अशा शब्दांत गौरव केला होता, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.  संघाच्या मंचावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध नामवंतांनी संघकार्याचा गौरव केला असताना, प्रणव मुखर्जी यांच्या हजेरीचा एवढा धसका असहिष्णु गटांनी का घेतला आहे, असा सवालही संघाच्या मुखपत्रातील या लेखातून करण्यात आला आहे.