काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात ३६ चा आकडा असल्याची बाब सर्वश्रूत आहे. टोकाच्या वैचारिक मतभेदांमुळे दोन्हीही संघटना एकमेकांची प्रत्येक गोष्ट वर्ज्य मानतात. मात्र, नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवन येथील कार्यालयात राष्ट्रगीताऐवजी चक्क संघाची प्रार्थना वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांकडून हा प्रकार नाकारण्यात येत असला तरी पत्रकारांच्या वर्तुळात या प्रकाराची खमंग चर्चा रंगली आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला टिळक भवन येथील कार्यालयात ध्वजवंदनासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी तिरंग्याला मानवंदना देताना राष्ट्रगीताची धून वाजवण्यात येणार होती. मात्र, स्पीकरवरून संघाच्या प्रार्थनेचे सूर ऐकू यायला लागल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धांदल उडाली, असे वृत्त ‘तरूण भारत’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. यामुळे काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी ध्वजारोहण केल्यानंतर सर्वजण राष्ट्रगीतासाठी सावधानच्या पवित्र्यात उभे होते. मात्र, त्यावेळी स्पीकरवरून संघाची ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना वाजायला लागली. थोडावेळ सर्व मंडळींना याचा उलगडाच झाला नाही. राष्ट्रगीताऐवजी संघाच्या प्रार्थनेचे सूर ऐकून अशोक चव्हाण प्रचंड संतापले. त्यानंतर ध्वनिक्षेपक तात्काळ बंद करून राष्ट्रगीताची सीडी शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. मात्र, काही वेळानंतर राष्ट्रगीत आणि संघाची प्रार्थना एकाच सीडीत असल्याचा उलगडा झाला. त्यानंतर ही सीडी फास्ट फॉरवर्ड करून राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र, तोपर्यंत आयोजकांची चांगलीच शोभा झाली होती.
राष्ट्रगीतासोबत काही देशभक्तीपर गाणी डाऊनलोड करून सीडी तयार केल्याचे व त्या धांदलीमध्ये संघाची प्रार्थना चुकून कॉपी झाल्याचे समजते. मात्र, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा सगळा प्रकार घडल्याचे नाकारले आहे. सचिन सावंत यांनी हे वृत्त फेटाळले असून असा कोणताचा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे. मी स्वत: त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो आणि सीडी तयार करण्याची जबाबदारीही माझी नव्हती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझ्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापणाऱ्या वृत्तपत्राविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.
१. जळगाव तरुणभारतने माझे नाव घेऊन छापलेली बातमी धादांत खोटी असून हे पीत पत्रकारितेचे उदाहरण आहे. प्रथमतः संघाची प्रार्थना ही संविधान विरोधी असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या प्रदेश काँग्रेस तर्फे आयोजित झेंडावंदनाच्या कार्यक्रमात ते वाजण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तशी ती वाजलीही नाही
— Sachin Sawant (@sachin_inc) January 30, 2018
२. दुसरं मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो व राष्ट्र गीताची सीडी बनविण्याची जबाबदारी ही माझी नसते.
तरीही कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता व अधिकृत प्रतिक्रिया न घेता छापलेली सदर बातमी ही बदनामीकारक असल्याने सदर वृत्तपत्राला कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल.— Sachin Sawant (@sachin_inc) January 30, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 5:48 pm