01 March 2021

News Flash

संघालाही खडसे नकोसे!

पुण्यातील जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आता एकाकी पडू लागल्याचे चित्र आहे.

एकनाथ खडसे

सरसंघचालकांनी भेट नाकारली; गडकरींची मध्यस्थाची भूमिका
पुण्यातील जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आता एकाकी पडू लागल्याचे चित्र आहे. भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने खडसे यांच्याविरोधातील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याची अटकळ बांधली जात असतानाच मंत्रिपद वाचविण्यासाठी खडसे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, भागवत यांनी खडसे यांना भेट नाकारल्याने खडसे पक्षासाठी दखलपात्र राहिले नसल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच जबाबदार कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करू द्यावे, असे ट्विट खडसे यांनी शुक्रवारी केल्याने खडसे यांच्याकडील महसूल खाते काढून घेतले जाते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
खडसे यांच्यावरील आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पक्षाच्या केंद्रीय पातळीवर विचारविनिमय करण्यात येत आहे. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पदावरून दूर करायचे वा त्यांच्याकडील महसूलसारखे महत्त्वाचे खाते काढून त्यांना योग्य तो संदेश द्यायचा यावर पक्षात खल सुरू आहे. मात्र, खडसे यांच्या संदर्भात उचित कारवाईबाबत पक्ष आदेश देईल, असे थेट विधान मुख्यमंत्र्यांनी केल्याने खडसे यांची गच्छंती होणार, असा अर्थ काढला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी भूमिका घेतल्याने खडसे यांनी मंत्रिपद वाचविण्याकरिता रा. स्व संघाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी खडसे यांना भेट नाकारल्याचे समजते. त्यामुळे खडसे संघालाही नकोसे झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात सुरू झाली. मग त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
दरम्यान, ट्विटरवरून खडसे यांनी केवळ कृषिमंत्रिपदाचा उल्लेख केल्याने तर्कवितर्काना उधाण आले होते. दहा खात्यांचा पदभार असलेल्या खडसे यांनी फक्त कृषी खात्याचाच उल्लेख का केला, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. खडसे यांच्याविरुद्ध कारवाईसाठीच भाजपने विधान परिषद निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान टाळल्याचे बोलले जाऊ लागले आहे. मोदी आणि शहा हे खडसे यांच्या भवितव्याबाबत चर्चा करणार आहेत. मंत्र्यांवर झालेले आरोप, त्यानंतर दिल्लीत अहवाल, पक्षाच्या पातळीवर खल ही सारी प्रक्रिया काँग्रेसमध्ये केली जायची. भाजपचेही काँग्रेसीकरण झाल्याची टीका या निमित्ताने केली जात आहे.

पाठीशी कसे घालणार?
‘आदर्श’ घोटाळ्यात पदाचा दुरुपयोग केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा चव्हाणांच्या राजीनाम्याच्या मागणीत भाजप आघाडीवर होता. पुण्यातील जमीन प्रकरणात खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबियांचा आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे समोर आले आहे. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी भाजपकडून केली जाते. मग खडसे यांना पाठीशी कसे घालणार, असा सवाल भाजपच्या एका नेत्याने केला.

जबाबदार कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मी लक्ष देत आहे. निराधार आरोपांवर खुलासे करण्यापेक्षा मला कृषी खात्याचे काम करू द्या.
– एकनाथ खडसे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:18 am

Web Title: rss refuse eknath khadse
टॅग : Eknath Khadse,Rss
Next Stories
1 पाच वर्षांत मेट्रो ठाण्यात!
2 खाऊखुशाल : श्री अन्नपूर्णा  आरोग्यवर्धक सोशल अड्डा
3 ‘त्या’ बहुमजली झोपडय़ांना जबाबदार कोण?
Just Now!
X