विदर्भावर सातत्याने अन्याय झाला असून स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्रप्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी मांडली आहे.

याआधी विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाची भूमिका मांडल्यामुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली असताना आता संघानेही स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा जाहीर केला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना, तात्काळ मदत आणि भूजल पातळी वाढविण्यासंदर्भातील उपाययोजना याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी विदर्भावर अन्याय झाल्याचे सांगितले. कांदिवली येथील दामुनगर झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीतही संघाचे शंभर कार्यकर्ते मदत करत असून लोकांच्या जेवणापासून त्यांना आवश्यक ती मदत देण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले. यापूर्वी मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात संघाने राबविलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहितीही त्यांनी दिली.