५०० व एक हजार रुपयांच्या नोटांसाठी २४ नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ दिल्यानंतर  मुंबईच्या प्राद्रेशिक वाहतूक कार्यालयातही (आरटीओ) गुरुवार पासून ५०० व एक हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पूर्वी जुन्या नोटा स्विकारण्याची अंतिम तारिख १४ नोव्हेंबर दिली होती. मात्र नंतर ही मुदत २४ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली. मात्र १४ नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतर मुंबईतील ‘आरटीओ’मध्ये जुन्या नोटा स्विकारण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून वाहन परवाने, कर भरणे किंवा इतर कामासाठी ५०० व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन येणाऱ्यांची पंचाईत झाली होती. याचा सर्वात जास्त फटका रिक्षा व ट्रक चालकांना बसला होता मात्र १७ नोव्हेंबर पासून ‘आरटीओ’च्या प्रत्येक कार्यालयात जुन्या नोटा स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांना याचा दिलासा मिळाला आहे. येत्या २४ तारखेपर्यंत आरटीओमध्ये या नोटा स्वीकारल्या जातील असे  एका अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्हा सहकारी बँकांना परवानगी नाही

चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास जिल्हा सहकारी बँकांना परवानगी न देण्याचा पुनरुच्चार अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. सहकारी बँकांना चलनबदली करण्याची परवानगी दिल्यास जिल्हा सहकारी बँका काळा पसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असे जेटली यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेने १४ नोव्हेंबर रोजी  जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.