चाचणी मार्ग नसल्याने वहन योग्यता तपासणी बंद होण्याची चिन्हे; ठाण्यात चाचणीवर बंदी

‘वहन योग्यता प्रमाणपत्रा’करिता आवश्यक चाचणी करण्याकरिता पुरेसा मार्ग (ट्रॅक) नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपुऱ्या सुविधांचे प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) बंद करण्याच्या आदेशाचा फटका मुंबई महानगर प्रदेशात ठाणे ‘आरटीओ’ कार्यालयाला बसला आहे. या कार्यालयातील वहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी बंद करण्यात आली असून लवकरच मुंबईतील आरटीओवरही हे संकट येणार आहे. मुंबईतील कार्यालयांना १५ जूनची मुदत देण्यात आली  आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील काही आरटीओ कार्यालयांना २५० मीटरचा ‘ब्रेक चाचणी पथ’ उभारण्यासाठी ३१ मे २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. यात ठाणे आरटीओ कार्यालयाचाही समावेश होता. ही मुदत संपुष्टात आल्याने येथील वहन योग्यता प्रमाणपत्र तपासणीचे कामकाज बंद करावे लागले आहे. या कार्यालयासाठी चाचणी पथ निर्माण करण्याचे काम अंबरनाथ येथे सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने ठाणेकरांना हे प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मुंबईत धाव घ्यावी लागणार आहे.

ठाणे आरटीओनंतर मुंबईतील दोन आरटीओंसमोरही पेच आहे. मुंबईसह ठाणे आरटीओला जागेची अडचण आहे. मुंबईतील आरटीओंची मुदत १५ जून रोजी संपणार आहे. मुंबईत वडाळा, अंधेरी आणि ताडदेव हे महत्त्वाचे आरटीओ असून यावर मोठा ताण आहे. वडाळा आरटीओला नुकतीच त्याच परिसरात एमएमआरडीएच्या जागेत ४०० मीटरची जागा उपलब्ध झाली असून त्यावर चाचणीही घेण्यात येत आहे. मात्र अंधेरी आणि ताडदेव आरटीओचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अंधेरी आरटीओसाठी वसरेव्यात तर ताडदेव आरटीओसाठी महालक्ष्मी येथील वेलिंग्टन क्लबच्या परिसरात चाचणी पथाची जागा निवडण्यात आली आहे. यातील अंधेरी आरटीओला वसरेवा येथील जागा नुकतीच उपलब्ध झाली आहे. तर ताडदेव आरटीओसाठीची जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन आरटीओसमोर १५ जूनपर्यंत ब्रेक चाचणी पथ उभारण्याचे आव्हान असणार आहे.

चाचणी मार्ग नसताना प्रमाणपत्रे

अवजड वाहनांसह, रिक्षा, टॅक्सी, बस यांना दरवर्षी वहन योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. नवीन वाहन असले तर सुरुवातीला दोन वर्षांनी आणि त्यानंतर एका वर्षांनंतर हे प्रमाणपत्र चाचणी देऊन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचणीत संबंधित वाहन रस्त्यावर धावण्यास योग्य आहे की नाही ते तपासले जाते. परंतु त्यासाठी लागणारे २५० मीटरचे ट्रॅक मुंबईसह राज्यातील आरटीओत उपलब्धच नव्हते. चाचणी न करताच दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांबद्दल उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा प्रकार सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणारा असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने तातडीने हे ट्रॅक उभारण्याचे आदेश आरटीओंना दिले. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मुंबईतील दोन आरटीओसाठी टेस्ट ट्रॅकसाठी १५ जूनपर्यंत मुदत आहे. ट्रॅकचे काम शक्य झाले नाही तर ताडदेव आणि अंधेरी आरटीओतील चाचणीची कामे तात्पुरती वडाळा आरटीओत घेण्यात येतील. ठाणे आरटीओचे काम लवकरच पूर्ण होईल.

शेखर चन्ने, परिवहन आयुक्त