‘सीबीआय’च्या दाव्यावर न्यायालय मात्र नाराज
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयितांची नावे सीबीआयने बुधवारी उच्च न्यायालयासमोर सादर केली. हे दोन्ही संशयित सनातन संस्थेचे सदस्य असल्याची माहितीही या वेळी न्यायालयाला देण्यात आली. मात्र त्याचवेळी गोवा बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता रुद्र पाटील याचा हत्येतील सहभाग अद्याप पुढे आलेला नसल्याचा दावाही सीबीआयतर्फे करण्यात आला. त्यावर न्यायालयाने सीबीआयच्या तपासाबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली.
दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त करताना सीबीआयच्या तपासापेक्षा एसआयटीच्या तपासाची प्रगती चांगली असल्याचेही म्हटले.
डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआय तसेच एसआयटीकडून केल्या जाणाऱ्या तपासावर देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने, तर पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याची गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी आणि सनातन संस्थेचाच कार्यकर्ता रुद्र पाटील याची घनिष्ट मैत्री असून पानसरे आणि दाभोलकर या दोन्ही हत्या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याची शक्यता न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी वर्तवली होती. तसेच फरारी रुद्र पाटीलला शोधण्यासाठी नेमके काय प्रयत्न केला, याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
दाभोलकर हत्येप्रकरणी दोनजणांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांचा शोध लावण्यात आला असून दोन्हीही संशयित सनातनचे सदस्य असल्याचे सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले व त्यांची नावेही सादर करण्यात आली. परंतु रूद्र पाटील याचा सहभाग अद्याप उघड झालेला नसल्याचा दावा सीबीआयने केल्यावर न्यायालयाने सीबीआयच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचिकाकर्त्यांच्या वतीने पाटील आणि अन्य संशयित सारंग अकोलकर याचे रेखाचित्र आणि छायाचित्र सीबीआयला देण्यात आलेले आहे. असे असताना त्याचा सहभाग उघड झालेला नाही, असे सीबीआय कशाच्या आधारे सांगत आहे, असा सवाल केला. त्यामुळे या दृष्टीने तपास करण्याचे सीबीआयच्या वतीने अ‍ॅड्. रेबेका गोन्साल्विस यांनी न्यायालयाला सांगितले.