माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी ‘राज’ मार्गावरून गेल्याने संतापलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी आणि भाजप शिवसेनेची युतीच अभंग आहे, हे पटविण्यासाठी वरिष्ठ भाजप नेत्यांनी मंगळवारी शिवसेनेसाठी पुन्हा ‘नमो-नमो’ चा सूर आळविला.
गेल्या आठवडय़ात गडकरी आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यापासून शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा होऊनही उध्दव ठाकरे यांची नाराजी कमी झाली नाही. फडणवीस यांनी मंगळवारीही सकाळी ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. लोकसभेसाठी मनसेने भाजपविरोधात फारसे उमेदवार उभे न करता शिवसेनेविरोधात केले आहेत आणि पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेच्याच उमेदवारांचा प्रचार केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर भाजपचे केंद्रीय नेते व राज्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनीही सायंकाळी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना तशी ग्वाही दिली. शिवसेनेशी भाजपचे अतिशय जुने ऋणानुबंध आहेत व ते कायम राहतील, असे रुडी यांनी सांगितले.