News Flash

‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ महाअंतिम फेरीत

मुंबई विभागीय अंतिम फेरीत रुईया महाविद्यालयाची बाजी

मुंबई विभागीय अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकांकिकेला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपयांचा धनादेश देताना परीक्षक ऋषिकेश जोशी, राजन भिसे, ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे आणि ‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी.

मुंबई विभागीय अंतिम फेरीत रुईया महाविद्यालयाची बाजी

मुंबई ; रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ या एकांकिकेने मुंबई विभागीय अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला. लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, संगीत या चार विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरत रुईया महाविद्यालयाने महाअंतिम फेरीत धडक मारली. २१ डिसेंबरला होणाऱ्या महाअंतिम फेरीत राज्यभरातून आलेल्या आठ एकांकिका सादर होतील. यात ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ ही एकांकिका मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करेल.

महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘अर्धविराम’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट लेखन आणि अभिनयाच्या पारितोषिकासह द्वितीय क्रमांक पटकावला. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाची ‘भाग धन्नो भाग’ ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट अभिनय आणि नेपथ्य ही पारितोषिकेही जिंकली. या स्पर्धेसाठी राजन भिसे आणि ऋषिकेश जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ऋषिकेश जोशी यांनी पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना अधिक सुजाण होण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला. ‘एकांकिकेला प्रतिसाद देताना तो संयमाने द्यावा. अतिप्रतिसाद दिल्याने कलाकारांचे संवाद ऐकू येत नाहीत’, असे ते म्हणाले. तसेच दिग्दर्शकांनी अती तालीम करून घेतल्याने कलाकारांवर ताण येत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ‘दिवसभरात सादर झालेल्या सर्व एकांकिका उत्कृष्ट होत्या. त्याबाबत मी समाधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांत एकांकिकांच्या सादरीकरणाचे एक विशिष्ट सूत्र तर तयार होत नाही ना, याचा विचार करावा’, असे राजन भिसे म्हणाले.

तरुणांची स्पंदने जाणणारी ‘लोकांकिका’

लोकसत्ता लोकांकिका हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून आज परीक्षण करण्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर विविध विषयांवरील एकांकिका पाहण्याची संधी मिळाली. एकांकिकांतून चालू घडामोडींवर भाष्य करण्यात आले. संगीत, प्रकाश, नेपथ्य, अभिनय यात सफाई दिसली. आजच्या सर्व एकांकिकांमध्ये तंत्रकुशलता पाहण्यास मिळाली. तरुणांची स्पंदने जाणणारी लोकसत्ता लोकांकिका खरोखरच दर्जेदार आहे. – ऋषिकेश जोशी, अभिनेते-दिग्दर्शक

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेमुळे पडद्यामागील कलाकारांना एक ओळख मिळण्यास मदत झाली. गेली दोन वर्षे लोकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेत एक वेगळी प्रकाशयोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा पुरस्कार माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचंही आहे.  

– अमोघ फडके, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, बुद्रुकवाडीचा मारुती बाटला

लोकसत्ता आयोजित लोकांकिका स्पर्धा ही अत्यंत मानाची समजली जाते. या स्पर्धेवरून विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीचा अंदाज बांधता येतो. या एकांकिकेत प्रत्येक दृश्यात लाईव्ह आणि ध्वनिमुद्रित संगीताचा वावर करण्यात आला आहे.

– श्रीनाथ म्हात्रे, सर्वोत्कृष्ट संगीत, बुद्रुकवाडीचा मारुती बाटला

लोकांकिका स्पर्धेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ आहे, आणि पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाल्याने आत्मविश्वास अधिकच दुणावला आहे. या स्पर्धेत ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवल्याचा आनंद आहे.

– ऐश्वर्या मिसाळ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, भाग धन्नो भाग

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत नेपथ्य करण्याचे माझे स्वप्न होते. नेपथ्य करताना प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्यात आले. त्याचे फळ मला आज मिळाले.   

  – केतन दुदवडकर, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, भाग धन्नो भाग

 

सर्वोत्कृष्ट एकांकिका, प्रथम :  ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’, रुईया महाविद्यालय

सर्वोत्कृष्ट एकांकिका, द्वितीय : ‘अर्धविराम’, महर्षी दयानंद महाविद्यालय

सर्वोत्कृष्ट एकांकिका, तृतीय :  ‘भाग धन्नो भाग’, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय

सर्वोत्कृष्ट नेपथ्य :  केतन दुदवडकर (भाग धन्नो भाग)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : रणजित पाटील, अजय कांबळे (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना :  अमोघ फडके

(बुद्रुकवाडीचा मारुती बाटला) सर्वोत्कृष्ट लेखन:  ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ (प्राजक्त देशमुख), ‘अर्धविराम’ (रोहीत मोहिते, अभिषेक गावकर)

सर्वोत्कृष्ट अभिनय :  आर्य आढाव (अर्धविराम)

सर्वोत्कृष्ट अभिनय :  ऐश्वर्या मिसाळ (भाग धन्नो भाग)

सर्वोत्कृष्ट संगीत :  श्रीनाथ म्हात्रे

(बुद्रुकवाडीचा मारुती बाटला)

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:00 am

Web Title: ruia college enter mega final round from mumbai division in loksatta lokankika
Next Stories
1 ‘लोकांकिका’च्या कलाकारांसह प्रेक्षकांचाही दांडगा उत्साह
2 ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प परत
3 बोगस डॉक्टरांना पालिकेचे अभय?