मुंबईत विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेले महाविद्यालय कोणते असा प्रश्न विचाराल तर पहिल्यांदा माटुंग्याचे रुईया आणि रूपारेल, पाल्र्याचे साठय़े या महाविद्यालयांची नावे येतात. पण, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या यंदाच्या विद्यार्थ्यांचा कल पाहता हे चित्र बदलल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता सर्वाधिक अर्ज केलेल्या पहिल्या ३० महाविद्यालयांच्या यादीवरून तरी विद्याविहारच्या एस. के. सोमय्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता पहिली पसंती दिल्याचे दिसून येते. त्या खालोखाल मागणी असलेले महाविद्यालयही विद्याविहारचेच ‘के. जे. सोमय्या कला आणि विज्ञान महाविद्यालय’ आहे हे विशेष. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये मिळून १२,१५९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्या खालोखाल अर्थात विद्यार्थ्यांनी रुईया (५०२२) महाविद्यालयाला पसंती दिली आहे.
ही इतकी तफावत कशी असा प्रश्न नक्कीच पडेल? याला कारण अर्थातच विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे वाढलेला कल आहे. कारण, सोमय्याला असलेली मागणी ही बीकॉमसाठीची आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक मागणी असलेल्या पहिल्या १२ महाविद्यालयांमध्ये एक रूईयाच्या बीएस्सीचा अपवाद वगळता सर्व अभ्यासक्रम हे बीकॉमचे आहेत. तर ३० महाविद्यालयांच्या यादीत पाच-सहा अभ्यासक्रम वगळता बहुतांश बीकॉमचेच आहेत. या यादीत बीएसाठी मागणी असलेले सेंट झेवियर्स हे एकमेव महाविद्यालय आहे. तर एलएलबीकरिता चर्चगेटच्या ‘सरकारी विधी महाविद्यालया’ला (जीएलसी) विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रवेशअर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व केलेल्या ऑनलाइन नोंदणीतून ही माहिती मिळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी रुईया (बीएस्सी- ४,६५९अर्ज) या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. यंदा हे महाविद्यालयातील अर्जाची संख्या वाढूनही  तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. के.जे. सोमय्याच्या अर्जाच्या संख्येने मात्र गेल्या वर्षीच्या ४,५२५वरून ५१९३ वर उसळी घेतली आहे. उपनगरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे या यादीवरून दिसून येते.
अकरावीची ‘कट ऑफ’ वाढली
दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे अकरावी प्रवेशाची ‘कट ऑफ’ ६-७ टक्क्यांनी वर गेली आहे. शाळांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांच्या कट ऑफमध्येही मोठी वाढ झाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी होणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये तिन्ही शाखा मिळून एक लाख ७६ हजार ८७६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. या प्रक्रियेसाठी एकूण दोन लाख तीन हजार ३७८ अर्ज सादर झाले होते. पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल ४४,८०६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.