आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्यांनी सवलत नाकारावी; पुण्याच्या ऊर्जाचे आवाहन

माझे आई-वडील महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे मी सरकारच्या सवलतीचा फायदा का घेऊ, असा प्रश्न उपस्थित करून ज्या मुलांचे कुटुंब आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे, अशांनी स्वत:हून सवलत नाकारा, असे आवाहन पुण्यातील एका विद्यार्थिनीने केले आहे. रुईया महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्राचार्याबरोबर थेट शिक्षणमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

पुण्याहून शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ऊर्जा भारतीय ही विद्यार्थिनी रुईया महाविद्यालयात दाखल झाली होती. येथे अकरावीत प्रवेश घेण्यासाठी मुलांना ५०० आणि मुलींना २५० रुपये शुल्क भरावे लागते. मात्र चांगल्या पदावर काम करणारे विद्यार्थ्यांचे पालक हे शुल्क भरू शकतात तर ही सवलत का स्वीकारावी असा प्रश्न ऊर्जा हिच्या मनात आला आणि मला शुल्कमाफी नको म्हणत तिने महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिले.

माझा आरक्षणाला विरोध नाही, मात्र जे आर्थिकदृष्टय़ा सबल आहेत अशा कुटुंबातील मुलींनी सवलत घेणे नाकारावे, असे आवाहन ऊर्जा हिने केले आहे. हॉटेलमध्ये खाण्यावर आपण हजारो रुपये उधळतो, तर शिक्षणासाठी ५०० रुपये शुल्क भरणे अवघड नाही, असे ऊर्जा हिचे म्हणणे आहे. ऊर्जा हिने समाज माध्यमांवर ‘गिव्ह इट अप गर्ल्स कन्सेशन’ नावाची मोहीम सुरू केली असून मुलींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तिच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.