‘उत्तम आहार आणि व्यायाम हे निरोगी आयुष्याचे रहस्य’, हा चिरपरिचित सल्ला शालेय जीवनापासून व्यक्तीच्या कानी पडतो. पण तो आचरणात आणणे सर्वाना शक्य होतेच असे नाही. करोनाकाळात आपल्या प्रत्येकाची आरोग्यदक्षता वाढली असली, तरीही आहाराबाबत पुरेशी जाणीव तयार झाली नाही. त्यासाठीच ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’च्या नव्या पर्वात  प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर वाचकांच्या आहारविषयक शंकांचे निरसन करणार आहेत.

‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादामध्ये सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद साधण्याची, आहारविषयक जाणून घेण्याची संधी  वाचकांना मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांत आहारतज्ज्ञ म्हणून ऋजुता दिवेकर यांचे नाव लोकप्रिय झाले. करिना कपूरपासून अनेक बॉलीवूड कलाकार दिवेकर यांचे आहारसल्ले पाळतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दिवेकर यांच्या फिटनेस सूत्राचे कौतुक के ले. भात-आमटी, पोळी-भाजी या चौरस आहाराचे महत्त्व त्या कायमच पटवून देतात. हळद-दूध, साजूक तुपापासून ते पोहे, उपम्यापर्यंत पारंपरिक पदार्थाचे आहारातील महत्त्व त्या नेहमीच सांगतात. ‘जे आवडते तेच खा’ परंतु व्यायामाच्या बाबतीत तडजोड नको. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांत आपले आरोग्य हरवत नाही ना, याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांतून, व्याख्यानांतून दिलेला आहे.

शंकापूर्ती.. करोनाकाळात आहार कसा असावा, घरातच असताना, बाहेर जाण्याची फारशी संधी नसतानाही व्यायाम कसा करावा, चरबी वाढणार नाही याची काळजी कशी घ्यावी, अशा अनेकविध शंकांचे समाधान या वेबसंवादातून केले जाईल.

सहभागासाठी   https://tiny.cc/LS_Aarogyamaanbhav_23Nov  येथे नोंदणी आवश्यक.