पोषक आहारतज्ञ्ज व सेलिब्रिटींच्या आहाराची काळजी घेणारी डायटीशिअन म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी ऋजुता दिवेकर आता मुंबई पोलिसांना योग्य ‘शेप’मध्ये आणण्यासाठी मेहनत घेत आहे. यासाठी 150 पोलिसांच्या एका पथकाच्या प्रशिक्षणालाही सुरूवात झाली आहे.

मुंबईच्या नायगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका महिन्यासाठी हे प्रशिक्षण सुरू असणार आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, प्रशिक्षणासाठी आलेल्या 150 पोलिसांवर कामाचा कोणताही ताण नसावा म्हणून त्यांना कामावरुन सुटी देण्यात आली आहे. स्वतः ऋजुता दिवेकर , केईएम इस्पीतळातील डॉक्टरांचं पथक आणि इशा फाउंडेशनमधील काही योग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू झालं आहे. हे दीडशे पोलीस दिवसातून 12 तास व आठवड्यातून सहा दिवस रोज सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत प्रशिक्षण केंद्रात दिवेकर यांच्या देखरेखीखाली असतील. रात्री-अपरात्री बंदोबस्तासाठी करावी लागणारी ड्युटी, अयोग्य वेळी बाहेरचं खाणं, अपुरी झोप असा पोलिसांचा सर्वसाधारण दिनक्रम असतो. या सगळ्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो, या सर्व बाबींचा विचार करुन दिवेकर यांनी पोलिसांसाठी विशेष डाएट प्लॅन तयार केला आहे.

कोण आहे दिवेकर –
कॉलेजमध्ये असतानाच ऋजुता यांनी ‘अॅरोबिक्स’ आणि ‘एस.एन.डी.टी’मधून स्पोर्टस-सायन्स अॅण्ड न्यूट्रिशियनचा कोर्स केला. या क्षेत्रातच आवड असल्याचं ओळखल्यानंतर त्यांनी आहारशास्त्रामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देत आपला अभ्यास पूर्ण केला. खाऊ नकापेक्षा सर्व काही खा, असे सांगत ऋजुता आज अनेकांना निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची गुरुकिल्ली गवसेल या दिशेनं हेल्थ फंडे देत आहेत.

करीना कपूरला मॅजिक फिगर साइज झिरोसाठी मंत्रा देणाऱ्या दुसऱ्यातिसऱ्या कोणी नाही तर मऱ्हाठमोळ्या ऋजुता दिवेकर यांनीच तिचं सौंदर्य आणखी खुलवण्यात मदत केली होती. करीना कपूरला सडपातळ, सुडौल दिसण्यासाठी डाएटचे धडे देणाऱ्या ऋजुता दिवेकर तेव्हापासून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. करीनाची झिरो फिगर पाहून तिच्या महिला चाहत्यांनी अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रत्येकजण ऋजुता यांनी दिलेले फिटनेस डाएट फॉलो करू लागले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रींपासून ते कॉर्पोरेट जगतातील मोठमोठ्या दिग्गजांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या दिवेकर यांनी हेल्थ मंत्रा देणारी विक्रमी खपाची पुस्तकेही लिहिली आहेत. ऋजुता यांनी पाश्चात्याचं अनुकरण न करता भारतीय परंपरेतून चालत आलेली आणि प्रत्येक व्यक्‍तीचा वेगळेपणा जपणारी अशी खाण्याची पद्धत विकसित केली.