विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करीत सत्ताधारी काँग्रेसचे आमदार विधानसभेत सोमवारी भलतेच आक्रमक झाले होते. मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देऊनही आमदार माघार घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. एकूणच ओल्या दुष्काळाचे निमित्त करीत विदर्भातील नाराज आमदारांच्या या चमूने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्याचे काँग्रेसच्या वर्तुळात बोलले जात आहे.
विदर्भातील अतिवृष्टीबाबत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षवेधीवर सत्ताधारी आमदारांमधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील नाराजी उघडपणे बघायला मिळाली. मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी जमीन वाहून गेलेल्यांना हेक्टरी २५ हजार मदत व बाकीच्या मदतीबाबत १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले.
यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सुनील केदार, वीरेंद्र जगताप, डॉ. नामदेव उसंडी, गोपाळ अगरवाल, सुभाष झनक, विजय धोटे, राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके आणि बच्चू कडू व डॉ. बोंडे हे अपक्ष आमदार जागा सोडून पुढे आले आणि तात्काळ मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी करू लागले. जमीन खराब (खरवडली) झालेल्यांनाही मदत मिळावी, अशी सदस्यांची मागणी होती. या गोंधळात तीनदा कामकाज तहकूब करण्यात आले.
मदतीचा निर्णय आठवडाभरात घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. कदम यांनी देऊनही आमदार शांत होत नव्हते. काँग्रेसचे आमदार आक्रमक झाल्याने भाजप, शिवसेना आणि मनसेच्या आमदारांनाही तशीच भूमिका घेतली.
विदर्भात अजूनही अतिवृष्टी सुरू आहे. नुकसानीचा अंदाज येण्यासाठी काही कालावधी लागेल. या आठवडाअखेर आपण पूरग्रस्त भागांना भेट देणार आहोत. पुढील सोमवारी मदतीचा निर्णय जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगूनही सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांचे समाधान झाले नाही. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या आसनासमोर चढून जोरदार घोषणाबाजी केली. परिणामी गोंधळातच पुरवणी मागण्या उरकण्यात आल्या.

नाराजी प्रकट
मंत्रिपद मिळत नाही वा ‘मनासारखी’ कामे होत नसल्याने विदर्भातील काँग्रेसच्या काही आमदारांमध्ये मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात नाराजीची भावना आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आमदार भलतेच आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या निकटवर्तीय आमदारांचा समावेश होता. परिणामी काँग्रेसमधील गटबाजीचा त्याला किनार आहे का, अशी कुजबूज विधान भवनाच्या परिसरात होती.