‘शहर व परिसरात अतिवृष्टी होणार असून मुलांना शाळेत पाठवू नये, लांबचा प्रवास टाळावा’, अशा आशयाचा लघुसंदेश मंगळवारी अनेकांना पाठविण्यात आला. मात्र, त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येत्या ४८ तासांत तीन तासांहून अधिक काळ जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असून मुलांना शाळेत पाठवू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा, अशा आशयाचा लघुसंदेश अनेकांना पाठवण्यात आला. या संदेशामुळे अफवा पसरली असून मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविरुद्ध राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४ अन्वये कारवाई करावी अशी तक्रार पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून खोटा लघुसंदेश पाठविणाऱ्यास एक वर्षांचा कारावास आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.