आंबेडकर भवन रातोरात पाडल्यानंतर झालेला वाद एकीकडे शमण्याची अजून चिन्हे नाहीत तर दुसरीकडे दादर परिसरात अफवांचा बाजारही गरम झाला आहे. आंदोलकांनी दुकाने फोडली, जाळपोळ केली. दादरमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून कुणीही तिकडे जाऊ नका, अशा प्रकारच्या अफवांचा सुळसुळाट झाला आहे, तर व्यापाऱ्यांनाही येणाऱ्या निनावी फोनमुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण आहे. संपूर्ण दादरमध्ये पुरेशा प्रमाणात बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात आली असून नागरिक आणि दुकानदारांनी घाबरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दादर येथील आंबेडकर भवन शुक्रवारी मध्यरात्री पाडण्यात आल्याने शनिवारी संपूर्ण दादरमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यातच, मंगळवारी भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेला मोर्चा हिंसक झाला, दादर टीटी परिसरातील काही दुकानांची तोडफोड आंदोलकांनी केली. तेव्हापासून दादर पूर्व परिसरात अफवा रोज मूळ धरू लागल्या  आहेत. गुरुवारी दादरमधील दोन व्यापाऱ्यांना मोर्चा निघाला असून दुकानांची तोडफोड करत आंदोलक येत असल्याचा निनावी फोन आला, त्यानंतर काही काळ दुकाने बंद करण्याचे सत्र सुरू झाले. पण कुठलाही मोर्चा नसल्याचे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सांगितल्यावर पुन्हा दुकाने उघडण्यात आली. दुपारी दुकाने बंद करा, दादरमध्ये जोरदार तोडफोड-जाळपोळ सुरू असून कोणीही त्या परिसरात जाऊ नका, अशा आशयाचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवर जोरकसपणे पसरवले जात आहेत. मंगळवारी झालेल्या तोडफोडीमुळे काही दुकानांचे फलक, काचा तोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे आंदोलक आले, अशी हूल उठली की दुकानदार झपाझप दुकाने बंद करत आहेत. बंदोबस्ताला असलेले पोलीस सातत्याने सुरक्षेची हमी देत असूनही काही दुकानदार मात्र नुकसानीच्या भीतीने दुकाने अर्धी उघडी ठेवूनच व्यवहार करीत आहेत. याविषयी मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर. डी. शिंदे यांना विचारले असता, गेल्या काही दिवसांपासून विनाकारण अफवा पसरवण्याचे प्रकार दादर परिसरात वाढल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वत: व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दुकानाला कुठलेही नुकसान होणार नाही, याचा विश्वास दिला असून पुरेसे पोलीस संरक्षणही ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात गुरुवारी दुपारी काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होत दुकाने बंद करण्यात आली तर शाळाही सोडून देण्यात आल्या.