News Flash

सांबा रिटायर होतोय..

सांबाकाका इडली चिली.. सांबाकाका मसाला राइस सांगितलाय लवकर.. सांबाकाका फ्रँकी आण..

सांबाकाका इडली चिली.. सांबाकाका मसाला राइस सांगितलाय लवकर.. सांबाकाका फ्रँकी आण.. रुपारेलच्या कॅन्टीनमध्ये हे नाव आता यापुढे ऐकू येणार नाही, कारण सांबाकाका आता रिटायर होतोय..! वयाच्या ९ वर्षांपासून रुपारेलमध्ये दाखल झालेल्या सांबाने रुपारेलकरांच्या मनावर गारूड केले होते. सांबाने रुपारेलमध्ये कामाला सुरुवात केली तो साधारण १९७९ चा काळ. त्या वेळी शोले सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्यामुळे या मुलाला रूपारेलकरांनी सांबा नाव दिले. कपबशी विसळण्यापासून त्याने कामाला सुरुवात केली. आता तो कॅन्टीनचा कॅशिअर झाला आहे. पण प्रत्येक विद्यार्थ्यांसोबतचे त्याचे नाते जिव्हाळ्याचे होते आणि आजही आहे. स्वत: गावाहून आल्यामुळे गावाकडून आलेल्या विद्यार्थ्यांविषयी त्याला जास्त आपुलकी होती. पैशाच्या अडचणीत कॅन्टीनची उधारी बुडवणाऱ्यांकडे त्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. गेली चार दशके त्याने रुपारेलच्या कित्येक पिढय़ा वाढताना पाहिल्या आहेत. ऊर्मिला मातोंडकर पासून ते ऐश्वर्या रायपर्यंत, राज ठाकरे, अद्वैत दादरकर, वीणा जामकर, सिद्धार्थ जाधव यांच्या आठवणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम तो हमखास करी. कुठला विद्यार्थी काय करतो, कसा आहे याची सर्व माहिती त्याच्याकडे होती. कॅन्टीनमध्ये काम करताना त्याला हिशेब लिहिण्यासाठी कधी पेन वहीची गरज लागली नाही. शालेय शिक्षण न घेताही सर्व हिशेब त्याच्या तोंडपाठ होते. अगदी महिनाभरानंतर विचारल्यावरही तो प्रत्येकाचा हिशेब अचूक द्यायचा. महाविद्यालयात नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांला काही माहिती हवी असल्यास सरळ सांबाचे नाव सांगितले जायचे, कारण रुपारेलचा कोपरान्कोपरा त्याला पाठ होता. मध्यभागी उभे राहून सर्व कॅन्टीनभर नजर फिरवणारा सांबा, गणपती उत्सवात न चुकता देणगीची वही प्रत्येक टेबलावर ठेवणारा सांबा, कोण कुठल्या खाण्याची ऑर्डर देणार याची माहिती असणारा सांबा आता रुपारेलकरांपासून दुरावणार आहे. तो रविवारी गावी आपल्या कुटुंबाकडे जाणार आहे. सांबाने आपल्यासाठी खूप केले आता तो निवृत्त होत असताना आपण त्यांच्यासाठी काही तरी करू या इच्छेने माजी व आजी विद्यार्थी रुपारेलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

आई आजारी असल्याकारणाने मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इथून जात आहे पण मला सर्व विद्यार्थ्यांची खूप आठवण येईल. त्यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे हीच माझी इच्छा आणि शुभाशीर्वाद आहेत, पण मुलांसोबत घालवलेला काळ माझ्या आयुष्यातील मोलाचा काळ होता.
सांबा

रुपारेलमध्ये माझा उमेदीचा काळ गेला आहे. त्यातही कॅन्टीन आमचा हक्काचे ठिकाण. पण कॅन्टीन सांबाशिवाय कल्पनाच करू शकत नाही. कारण त्याच्या सोबत एक वेगळेच नाते होते. सांबा आणि शिवा हे रुपारेलचे पिलर आहेत. रुपारेलमध्ये एकवेळ प्राचार्याचे नाव लक्षात नसेल पण सांबाचे नाव कुठलाच रुपारेलकर विसरणार नाही.
सिद्धार्थ जाधव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 9:55 am

Web Title: ruparel college samba kaka getting ready to retire
Next Stories
1 काळाचा ‘पट’ उलगडतोय
2 ‘ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट’कडून विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन अ‍ॅप
3 लहान धरणे, बंधारे यांची अधिक गरज
Just Now!
X