|| संजय बापट

रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेकडे लाखो ठेवीदारांच्या नजरा

सुमारे ५५ हजार सभासद आणि सात लाख ठेवीदारांचा जीव टांगणीला लावणाऱ्या पुण्यातील रूपी बँकेच्या विलीनीकरणासाठी ‘ठाणे जनता सहकारी बँक’ (टीजेएसबी) पुढे आली असून तिने तसा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेला दिला आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेकडे रूपीच्या ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत.

आर्थिक अनियमिततेमुळे गेल्या पाच वर्षांपासून रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधात अडकलेल्या आणि अवसायनाच्या मार्गावर असलेल्या रुपी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना यामुळे यश येण्याची चिन्हे आहेत. आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेवर रुपीचे भवितव्य अवलंबून असल्याची माहिती सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

सारस्वत, पंजाब नॅशनल या बँकांनीही रुपीच्या विलीनीकरणात स्वारस्य दाखविले होते. मात्र १,१०० कर्मचारी आणि ५५० कोटींचा तोटा, हे ओझे घेण्यास कोणतीच बँक तयार नव्हती. आता या बँकेत केवळ ३५० अधिकारी-कर्मचारी उरले असून  गेल्या वर्षभरात १७ कोटींची वसुली झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ठेव विमा आणि पत हमी महामंडळाच्या (डीआयसीजीसी) योजनेनुसार टीजेएसबीने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे.

‘टीजेएसबी’च्या प्रस्तावामुळे एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र सर्वच ठेवीदारांच्या हिताचा विचार करायला हवा, अशी सरकारची भूमिका आहे. टीजेएसबी तसेच रुपीच्या प्रशासक मंडळाशी संपर्क साधला असता, ही बाब रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला, तर रुपी बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेकडे दाखल झाला आहे, अशी माहिती सहकार भारतीचे सतीश मराठे यांनी दिली.

  • सुमारे १०५ वर्षांच्या रुपी बँकेवर आर्थिकआणि प्रशासकीय अनियमिततेमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ पासून आर्थिक र्निबध आणले आहेत.
  • त्याप्रमाणे सहकार विभागाने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ बसविले आहे.
  • मुख्यालयासह ३५ शाखा, ५५ हजार सभासद, सात लाख खातेदार आणि १,४०० कोटींच्या ठेवी असलेल्या या बँकेवर आर्थिक र्निबध आल्यापासून ठेवीदारांचे पैसे मोठय़ा प्रमाणात अडकून पडले आहेत.
  • या बँकेला पूर्वपदावर आणण्याचे तसेच तिच्या अन्य बँकेतील विलीनीकरणाचे अनेक प्रयत्न सरकारी पातळीवरून झाले.