|| शैलजा तिवले

मुंबई : लसीकरण मोहिमेची गती वाढावी आणि सर्व भागांत लस उपलब्ध व्हावी, अशा हेतूने खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात यामुळे ग्रामीण भाग लसीकरणापासून वंचित राहात असल्याचे दिसत आहे. लसखरेदीच्या स्पर्धेत शहरांतील मोठ्या रुग्णालयांची मक्ते दारी असल्यामुळे खासगी रुग्णालयांमार्फत के ले जाणारे लसीकरण शहरांपुरतेच मर्यादित राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत शासकीय केंद्रावर पुरेसा पुरवठा नाही आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा नाही, अशी परिस्थिती आहे.

राज्यात मे महिन्यात खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या सुमारे ३२ लाख ३८ हजार लशींच्या साठ्यापैकी सुमारे ५७ टक्के साठा मुंबई आणि पुण्यातील रुग्णालयांनी खरेदी केला आहे. तर राज्यातील एकूण खासगी लसीकरण केंद्रांपैकी सुमारे ७० टक्के केंद्रे याच भागात कार्यरत आहेत. राज्यात एकूण ३६६ खासगी लसीकरण केंद्रे कार्यरत असून यातील ११५ केंदे्र पुण्यात, तर १४५ केंद्रे मुंबईत सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मात्र एकीकडे सरकारी केंद्रात लशींचा तुटवडा आणि खासगी लसीकरण सेवेच्या अनुपलब्धतेमुळे अजूनही लसीकरण संथगतीनेच सुरू आहे. खासगी रुग्णालयांना लस खरेदीची मुभा दिल्यावर उपलब्ध दोन लसउत्पादक कंपन्याकडून लस खरेदीसाठी चढाओढ सुरू झाली. यात राज्य सरकारांचाही समावेश होता. जास्त प्रमाणात लस खरेदी करण्याची क्षमता असलेल्या आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी याचा फायदा घेत जास्तीत जास्त लशींचा साठा खरेदी केल्याचे दिसून येत आहे.

लशींचा ४० टक्के साठा मुंबईत

१ जूनच्या आकडेवारीनुसार राज्यात मे महिन्यात सुमारे ३२ लाख ३८ हजार कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशींचा साठा खासगी रुग्णालयांसाठी आला होता. यातील १३ लाख १३ हजार ३६० म्हणजेच ४० टक्के लशींचा साठा मुंबईतील रुग्णालयांनी खरेदी केला आहे.

पुण्यात १७ टक्के लससाठा, अन्य जिल्ह्यांत तुरळक

पुण्यात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन अशा  ५ लाख ५५ हजार २२०(१७ ट क्के) मात्रा खासगी रुग्णालयांनी खरेदी केल्या. पुण्यात ३० रुग्णालयांनी मिळून कोव्हीशिल्डच्या ५ लाख ४४ हजार मात्रा खरेदी केल्या. सर्वाधिक ६० हजार मात्रा पुनावाला मेमोरियल रुग्णालयाने घेतल्या. त्या खालोखाल सिम्बॉयसिस विद्यापीठ (५० हजार), ग्रँण्ट मेडिकल फाऊंडेशन, रुबी हॉल(५० हजार), सह्याद्री रुग्णालय(४८ हजार), जहाँगीर रुग्णालय(५० हजार), दीनानाथ मंगेशकर रुग्णालय(३६ हजार) यांचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनच्या १०,२४० मात्रा पुण्यात दोन रुग्णालयांना मिळालेल्या आहेत. नगर (५ हजार लशी), अकोला (३ हजार), औरंगाबाद (१,७ ५००), बारामती (१ हजार), कोल्हापूर (११ हजार), नागपूर (१३ हजार), नाशिक (१ हजार) आणि जळगाव(५ हजार) या जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांनी लससाठा खरेदी केला आहे.