राष्ट्रीय गुणवत्ता चाचण्यांच्या निकालांत शहरी भागांची पीछेहाट

पायाभूत सुविधांची वानवा आणि शहरी दुनियेपासून दुरावल्याने बौद्धिक क्षमतेबाबत घेतले जाणारे आक्षेप, यामुळे ग्रामीण भागांतील शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच शंका घेतली जाते. ही शंका धुळीस मिळवीत खेडय़ातली पोरच शालेय अभ्यासातही हुशार असल्याचे आता आकडेवारीनिशी स्पष्ट झाले आहे. गणित, विज्ञान आणि परिसर अभ्यास या विषयांत मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांतील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागांतील विद्यार्थीच हुशार असल्याचे राष्ट्रीय गुणवत्ता चाचण्यांच्या निकालातून उघड झाले आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासाचा वेग मंदगतीचाच असल्याचेही या चाचण्यांनी सिद्ध केले आहे.

खासगी संस्थांकडून करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या सर्वेक्षणावर दरवर्षी वाद रंगतात. त्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी सरकारने देशव्यापी चाचणी घेतली. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) ही चाचणी घेण्यात आली होती. राज्य पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रगती चाचण्यांसारखीच ही गुणवत्ता चाचणी तिसरी, पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.

या चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या निराशादायक स्थितीवर शासकीय शिक्कामोर्तबच झाल्याचे दिसत आहे. आठवीला गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रात बहुतेक जिल्ह्य़ांतील एकूण विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही सरासरी ४० टक्क्यांच्या जवळपास असल्याचे दिसत आहे. पाचवी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांतील गुणवत्तेची सरासरी अधिक आहे. शहरी भागांतील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ही साधारण ३० ते ४० टक्क्यांदरम्यान आहे तर ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण हे ५० ते ६५ टक्क्यांदरम्यान आहेत. मुंबईसह पुणे, नागपूर या शहरांमधील विद्यार्थ्यांच्या गुणाची सरासरीही घसरेली दिसते. त्या तुलनेने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची सरासरी गुणवत्ता अधिक आहे.

झाले काय?

राज्यातील निवडक शाळांमधील तिसरी, पाचवी आणि आठवी इयत्तेतील जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये सरकारने आयोजिलेल्या गणित, विज्ञान किंवा परिसर अभ्यास, भाषा यांच्या चाचण्या दिल्या.आठवीसाठी या विषयांबरोबरच सामाजिक शास्त्रांचाही समावेश होता. रोजच्या जीवनातील आणि सृष्टीतील वैज्ञानिक तत्त्वे ओळखता येणे, गणिताचा व्यवहारात उपयोग करता येणे, मूलभूत हक्क, इतिहास, शासकीय प्रक्रिया याची जाण असणे या मुद्दय़ांच्या आधारे विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती.

प्रत्येक जिल्ह्य़ातील, प्रत्येक इयत्तेचे विषयानुसार निकाल शासनाने जाहीर केले. या चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान या विषयांत शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक गुण मिळाले आहेत.

शहर फक्त ‘बोलघेवडे’

* भाषेच्या अभ्यासात शहरी भागांतील विद्यार्थी पुढे असल्याचे दिसते. वाचन लेखनाच्या पलिकडे जाऊन भाषेचे आकलन, भाषेचा वापर करता येणे अशा पातळ्यांवर भाषेची चाचणी घेण्यात आली होती.

* भाषेमध्ये ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ही साधारण ५० ते ६० टक्क्यांदरम्यान असल्याचे दिसते तर शहरी भागांतील विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे दिसते.