एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या कथित ‘बंद’च्या भीतीमुळे आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व बाजारपेठांमध्ये रविवारी सायंकाळी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. काहीजण महिन्याभराची खरेदी करीत असल्याचे दृश्य रविवारी सायंकाळी दादरसह गिरगाव, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली येथील बाजारपेठांत पाहायला मिळाले. रविवारी ग्राहकांची गर्दी असतेच. परंतु यावेळची गर्दी वेगळी असल्याचे काही दुकानदारांनी सांगितले.
एलबीटी विरोधात ६ आणि ७ मे रोजी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. किराणा माल, भाजीविक्रेते, फळविक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आवश्यक वस्तुंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दोन दिवस लागणाऱ्या वस्तूंची खरेदी  करण्यात मुंबईकर मश्गूल झाले होते. रविवारची सुट्टीची संध्याकाळ मुंबईकरांनी फिरण्यापेक्षा आवश्यक वस्तूंच्या खरेदीत घालविली. डाळ, साखर, कडधान्ये, गूळ अशा अनेक आवश्यक वस्तूंबरोबरच भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.  किराणा मालाची दुकाने तुडुंब भरल्याची दिसत होते. साधारणत: प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत किराणा मालाच्या दुकानात गदी असतेच. मात्र यावेळची गर्दी भीतीपोटी होती, असेही काही दुकानदारांनी मान्य केले. काही किराणा दुकानांमध्ये संपामुळे गेले काही दिवस अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, अशी काही ग्राहकांची तक्रार आहे. काही  व्यापाऱ्यांनी दोन दिवस आधीपासूनच आपल्या नेहमीच्या खरेदीदारांना बंदची माहिती करून दिली होती. त्यामुळे, शनिवारीही बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी होती.
दोन दिवस खरेदीदार फिरकणार नाही, म्हणून फळ आणि भाजी विक्रेत्यांची मात्र चांगलीच अडचण झाली होती. फळे हा नाशवंत माल असल्याने अनेक फळविक्रेते ग्राहकांना आग्रह करून फळांची विक्री करीत होते. त्यासाठी किंमतीतही तडजोड करायला ते राजी होत होत असल्याचे चित्र दिसत होते.