‘रॉयल ऑपेरा हाऊस’मध्ये महोत्सवाचा शुभारंभ

बाहेरून येऊन आपल्याकडे महोत्सवांच्या माध्यमातून त्यांचे चित्रपट पोहोचवू पाहणाऱ्या देशांची संख्या वाढते आहे. ‘मामि’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबरोबरच ऑस्ट्रेलियन चित्रपटांचा महोत्सव आपल्याकडे होतो. नुकतेच चिनी चित्रपट पाहण्याची संधीही चित्रपटरसिकांना मिळाली होती. आता या आठवडय़ात मुंबईकरांना विविध जॉनरचे रशियन चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. १५ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत रशियन फेडरेशनचा कला-संस्कृती विभाग आणि रशियन फिल्ममेकर युनियन यांच्या सहकार्याने रशियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ पुन्हा रसिकांच्या सेवेत दाखल झालेल्या ‘रॉयल ऑपेरा हाऊस’मध्येच होणार आहे.

‘रशियन फिल्म डेज’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रशियन चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वात त्यांचे चित्रपट, रशियन अभिनेते-दिग्दर्शक यांच्याशी भेट, चर्चा, बॉलीवूड स्टुडिओजचा त्यांचा खास दौरा अशा विविध माध्यमांतून हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘व्हेरी बेस्ट डे’ या रशियन चित्रपटाने होणार आहे. झोरा क्रेझोनिकोव्ह दिग्दर्शित हा चित्रपट ‘रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे दाखवण्यात येणार असून त्यानंतरचे महोत्सवातील चित्रपटांचे केंद्र ‘सिनेपोलिस’ चित्रपटगृहात असणार आहे. खेळावर आधारित ‘व्हेर्सस’, यावर्षी प्रदर्शित झालेला ओकसाना करास दिग्दर्शित ‘गुड बॉय’ हा विनोदी चित्रपट, निकोलाय खोमेरिकी दिग्दर्शित ‘आईसब्रेकर’, ‘फ्रायडे’ हा आणखी एक विनोदी चित्रपट, ‘क्वीन ऑफ स्पेड्स’ तसेच यावर्षी रशियात तिकीटबारीवर सुपरहिट ठरलेला निकोलाय लेबेदेव दिग्दर्शित ‘द क्रु’ हे चित्रपट या महोत्सवात पाहता येणार आहेत.

गेल्यावर्षी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त निवेदनात ‘रशिनय फिल्म डेज’चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर रशियाच्या आंतरराष्ट्रीय धोरणांतर्गत मोठय़ा स्तरावर भारतात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे महोत्सवाचे कार्यकारी निर्माते अ‍ॅलेक्सी गोव्होरुखीन यांनी स्पष्ट केले. ‘मुंबई ही भारतातील चित्रपटसृष्टीची राजधानी आहे हे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इथल्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र असलेल्या मुंबईत ‘रशियन फिल्म डेज’ हा महोत्सव आयोजित करण्यामागे सिनेमाच्या भाषेतून या दोन्ही देशांतील संस्कृतीची देवाणघेवाण होईल आणि रशियाची भारतासाठी एक धोरणी भागीदार म्हणून सकारात्मक प्रतिमा निर्माण होईल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा महोत्सव विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहेत.