News Flash

सोसायटीचे भूखंड गहाण ठेवून ‘रुस्तमजी’चे ४० कोटींचे कर्ज!

गेली सात वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांसाठी घरे बांधून होण्याआधीच या रहिवाशांच्या सोसायटय़ांचे भूखंड गहाण ठेवून खुल्या बाजारात विक्री करावयाच्या सदनिकांसाठी ‘

| December 4, 2013 04:24 am

सोसायटीचे भूखंड गहाण ठेवून ‘रुस्तमजी’चे ४० कोटींचे कर्ज!

गेली सात वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांसाठी घरे बांधून होण्याआधीच या रहिवाशांच्या सोसायटय़ांचे भूखंड गहाण ठेवून खुल्या बाजारात विक्री करावयाच्या सदनिकांसाठी ‘रुस्तमजी बिल्डर्स’ने स्टेट बँकेकडून ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब समोर आली आहे. सोसायटीच्या महासंघाने त्यासाठी रुस्तमजी बिल्डर्सला परवानगी दिल्याचे वरकरणी दिसत असले तरी यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेण्यात आलेली नाही. भविष्यात रुस्तमजी बिल्डर्सने कर्जाची परतफेड केली नाही तर जबाबदारी कोणाची, या शंकेने रहिवाशांना ग्रासले आहे.
अंधेरी पश्चिम येथील न्यू डी एन नगर येथील आठ सोसायटय़ांचे भूखंड गहाण ठेवून रुस्तमजी बिल्डर्सने ४० कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. सहा महिन्यांत परतफेड करण्याच्या अटीवर हे कर्ज मंजूर करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट येथील वाणिज्य शाखेने २३ जुलै २०१२ रोजी हे कर्ज मंजूर केले आहे, मात्र या कर्जाची अद्याप परतफेड करण्यात आलेली नाही.  
‘रुस्तमजी रिएलिटी प्रा. लि.’ने अप्पर जुहू असे संबोधून ‘रुस्तमजी इलेमेंट’ या नावाखाली १५ मजली आठ आलिशान टॉवर्स बांधण्याची घोषणा केली. याशिवाय १०  हजार चौरस फुटाचे क्लब हाऊस, ४० हजार चौरस फुटाचे थीम लँडस्केप पोडियम गार्डन, इन्डोअर मेडिटेशन आणि फिटनेस सेंटर, स्पा, जॉगिंग ट्रक, स्विमिंग पूल, एरोबिक सेंटर- जिम्नॅशिअम, बिझिनेस सेंटर, मीटिंग लाऊंज आदी भरभक्कम सुविधा देणारे ३,७८० ते ३,८०० चौरस फुटाच्या तीन व चार बीएचके फ्लॅटसाठी नोंदणी सुरू केली. त्यासाठी आलिशान साइट ऑफिस आणि नमुना सदनिकाही बांधण्यात आली आहे. या सदनिकांच्या उभारणीसाठी कर्ज उचलल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येत आहे.
आठ सोसायटय़ांच्या मालकीचा सुमारे २०,२१८ चौरस मीटर (त्यापैकी ७,२१६ चौरस मीटर मनोरंजन मैदानासाठी राखीव) इतका भूखंड असून, त्यापैकी १२,१४५ चौरस मीटर इतका भूखंड आणि त्यापोटी मिळणारे सुमारे ५,२१,२३६ चौरस फूट इतके चटईक्षेत्रफळही गहाण ठेवण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आमच्याकडे सर्व परवानग्या आहेत, असा खुलासा यासंदर्भात ‘रुस्तमजी रिएलिटी प्रा. लि.’कडून करण्यात आला. तर स्टेट बँकेच्या वाणिज्य शाखेशी संपर्क साधला असता, ‘भूखंडाच्या मालकीबाबतचा अहवाल अनुकूल होता. रुस्तमजीने विक्री करावयाच्या सदनिकांचे चटईक्षेत्रफळ गहाण ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात कर्जाची परतफेड न झाल्यास आम्ही हे चटईक्षेत्रफळ विकू शकतो,’ अशी प्रतिक्रिया संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
आता काय स्थिती?
२००५ पासून या सोसायटय़ांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला मे. वैदेही आकाश प्रा. लि. या विकासकाची विकासक म्हणून नियुक्ती केली. या विकासकाने आर्थिक साहाय्यासाठी विक्री करावयाचे चटईक्षेत्रफळ मे. रुस्तमजी रिएलिटी प्रा. लि.ला विकले, परंतु आता सोसायटीच्या महासंघाने विकासक म्हणून ‘रुस्तमजी’ची नियुक्ती केली. या प्रक्रियेला वैदेही आकाश प्रा. लि.ने न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 4:24 am

Web Title: rustomji get 40 crore loan by society land mortgage
Next Stories
1 खरंच मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे?; गेल्या ८ महिन्यांत २२९ बलात्कार!
2 कोकणातील गटबाजीला शरद पवार यांचा लगाम!
3 श्वानहुशारीने अंमली पदार्थाची तस्करी रोखली
Just Now!
X