मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी रायन इंटरनॅशनल शाळेचे संचालक ऑगस्टीन पिंटो, ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. मात्र, त्यांच्या अटकेला एक दिवसाची अंतरिम स्थगिती दिली. मात्र, त्यासाठी ऑगस्टीन पिंटो, त्यांची पत्नी ग्रेस पिंटो आणि रायन पिंटो यांना आज रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. ही अट पूर्ण केली तरच पिंटो कुटुंबियांना उद्या पाच वाजेपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून उद्या या तिघांनाही हरयाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करता येणे शक्य होईल. यावेळी पिंटो कुटुंबीयांच्या वकिलांनी रायन हे संस्थेचे विश्वस्त किंवा कर्मचारी नसल्याचे सांगत त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावत रायन पिंटो यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला.

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर (८ वर्ष) या विद्यार्थ्याची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. बस कंडक्टर अशोक कुमारनेच त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अशोक कुमारला अटक केली आहे. तर शाळा व्यवस्थापनाविरोधातही कारवाईची चिन्हे आहेत. पालकांनीही शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

हरयाणा पोलिसांचे पथक शाळेच्या संचालकांच्या चौकशीसाठी मुंबईत आले होते. या पार्श्वभूमीवर ‘रायन इंटरनॅशनल’चे संचालक ऑगस्टीन पिंटो, त्यांची पत्नी ग्रेस आणि सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. ‘रायन इंटरनॅशनल’ समूहाच्या देशभरात १३५ शाळा आहेत. या शाळांमध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थी आहेत.