बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याला गुरूवारी संध्याकाळी अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी शाहरूख खानची अनेक तास चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकाराबद्दल स्वत: शाहरूख खान याने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर अमेरिकेचे राजदूत रिच वर्मा यांनी ट्विटरद्वारे शाहरुखची माफी मागितली. यावर अमेरिकेतील बहुतेक सर्वच मोठ्या विमानतळांवर श्रीमान शाहरुख खानच्या बाबतीत हा ‘हादसा’ वारंवार झाला आहे व तरीही हे सहिष्णू मंडळ अमेरिकेच्या थपडा खाण्यासाठी पुन:पुन्हा त्यांच्या दरवाजात जात आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलेय.
आपल्याला लॉस एंजलिस विमानतळावर मिळालेल्या वागणूकीबाबत शाहरुखने संताप व्यक्त केल्यानंतर अमेरिकी राजदूत रिच यांनी माफी मागितली होती. ‘लॉस एंजलिस येथे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागतो. पुन्हा असे काही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. तुझ्या कामाने करोडो लोकांना प्रेरणा मिळतेय,’ असे रिच यांनी ट्विटरद्वारे म्हटले होते.  त्यानंतर शाहरुखने रिच यांच्या ट्विटला उत्तर देत ‘हरकत नाही सर. तुम्ही व्यक्त केलेल्या चिंतेबाबत आभारी आहे’ असे म्हटलेले. पण शाहरुखने त्याचा जर असा अपमान होत असेल तो त्या देशात जातोच कशाला, असा सवालही सामनात करण्यात आलाय.
शाहरुख खानच्या बाबतीत झाडाझडती, चौकशी हे प्रकार वारंवार घडत आहेत. याचे कारण त्याचे ‘माय नेम इज खान!’ गुरुवारी शाहरुख खानच्या बाबतीत लॉस एंजलिस विमानतळावर जे घडले त्याचा निषेध हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने करायलाच हवा. ‘‘तुम्ही माझा असा अपमान करणार असाल तर मला तुमच्या देशात पाऊल ठेवायचे नाही. हा पहा मी निघालो, आल्या पावली परत!’’ असा प्रखर स्वाभिमानी बाणा दाखवून शाहरुख महाशय हिंदुस्थानात परतले असते तर अमेरिकेचेच थोबाड फुटले असते व महासत्तेच्या तकलादू सहिष्णुतेचे बिंग फुटले असते, पण आमच्या बॉलीवूडकरांना स्वदेशावर सिनेमे काढायचे असतात व युरोप, अमेरिकेत जाऊन या अशा थपडा खायच्या असतात. वास्तविक खान मंडळींनी यातून एक धडा घेतला पाहिजे तो म्हणजे, ‘‘सारे जहां से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा!’’ शेवटी मातृभूमी हीच माता, या शब्दात सामनातून एका अर्थी शाहरुखची कानउघाडणीच करण्यात आली आहे.