विद्यापीठाच्या ‘अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’ विभागाच्या वतीने ‘सब ठाठ पडा रह जाएगा’ या नाटकाचे प्रयोग कलिना संकुल येथील मुक्ताकाश रंगमंच येथे २६ ते २९ डिसेंबरदरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहेत. ‘ब्रॉडवे’सारख्या विदेशी रंगभूमीवर गाजलेल्या ‘यू कान्ट टेक इट विथ यू’ या जॉर्ज एस. कॉफमन व मॉस हार्ट यांनी लिहिलेल्या इंग्रजी नाटकाचे ‘सब ठाठ पडा रह जाएगा’ हे हिंदी रूपांतरण आहे.
थिएटर आर्ट्स विभागाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विविध शैलींतील नाटकांची निर्मिती केली जाते.
यंदा ख्यातनाम सिनेनाटय़ दिग्दर्शक रणजीत कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक बसवण्यात आले आहे. थिएटर आर्ट्स विभागाच्या द्वितीय वर्षांतील विद्यार्थी कलाकारांनी भूमिका केलेल्या या नाटकाचे नेपथ्य विशाल पवार यांनी केले असून वेशभूषा व रंगभूषा अनुक्रमे नीलम सकपाळ व उल्लेश खंदारे यांनी केली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २६ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता कुलगुरू डॉ. संजय देशमुख व अभिनेते अन्नू कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या वेळी ‘९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलना’चे नियोजित अध्यक्ष गंगाराम गवाणकर व ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक अमोद भट यांचा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी नाटय़क्षेत्रातील अनेक कलावंत, साहित्यिक, रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत. नाटकाचे प्रयोग सर्वाना विनामूल्य असून जास्तीतजास्त रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन थिएटर आर्ट्स विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांनी केले आहे.