रेल्वे प्रवासात उशीर झाला तरी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची चूक करू नका, रेल्वे रुळ ओलांडताना तसेच टपावरून प्रवास करताना आपल्या कुटुंबाचा, मित्राचा विचार करा असे भावनिक आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मंगळवारी रेल्वे पोलिसांच्या कार्यक्रमात केले. प्रवासी सुरक्षेसंदर्भात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘समीप’ आणि  ‘बी-सेफ’ उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी सचिन बोलत होता. यावेळी रेल्वे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, उपायुक्त दीपक देवराज, रुपाली अंबुरे आदी उपस्थित होते.

मी लहानपणी एकदा माझ्या मित्रांसह रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका अनुभवला होता. रुळ ओलांडत असताना दोन्ही बाजूने लोकल आल्या. त्या वेगवान लोकल पाहून दोन रुळांच्या मधल्या जागेत गुडघ्यावर बसून राहिलो होतो. त्यानंतर कधीच रुळ ओलांडण्याचा विचारही मनात आणला नसल्याने सचिन याने सांगितले.