राज्यात सध्या वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून भाजपा अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी करत, भाजपाने राज्यभर आंदोलनही केले. शिवाय ”ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..जो पर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.” असल्याचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

“ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..”; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा

“महाविकासआघाडी सरकारने वीजबिले कमी करावी यासाठी इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते मोदी सरकारने आर्थिक व्होल्टेज कमी करुन सगळा लोड राज्यावर टाकला आहे यावर वीज अवरोधक स्लीपर घालून गप्प बसतात. या दांभिक भाजपाकडे लक्ष न देता जनतेला दिलासा कसा द्यायचा ते आम्ही पाहू!” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

या अगोदर “वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे. परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देशात इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी या लुटमारी विरोधातही आंदोलन करावे.” असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

केंद्र सरकारकडून जनतेची दररोज लूट; तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर – बाळासाहेब थोरात

तर, “उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो.” असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला होता.”