मुंबईमध्ये करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यांवर भाविकांची गर्दी होऊ नये याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते राम कदम यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या टीकेला, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिले आहे.

”यालाच म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडाला काळं फासणं. भाजपा नेत्यांना हे देखील माहिती नाही की, भाजपाशासीत राज्यांमध्येही छटपुजेचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसं आरएसएस इटलीमधूनच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. त्यांनी या ट्विटसोबतच राम कदम यांचं ट्विट देखील जोडलेलं आहे.

आणखी वाचा- भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, छटपूजेस परवानगी न देण्याच्या निर्णयावरून राम कदम यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, ”रावणराज चालवणारे मुघलशाही महाविकासआघाडी सरकार हिंदू धर्माच्या सणांना विरोध करणं केव्हा बंद करणार? अन्य धर्मांच्या सणांना परवानगी देण्यासाठी जी तत्परता दाखवतात, ती हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकासआघाडी सरकारचे निर्णय काय इटलीतून होतात का? आमची चेतावणी आहे छटपुजेला परवानगी द्यावी लागेल.”

आणखी वाचा- हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं रस्त्यावर उतरणार – राम कदम

या अगोदर राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून देखील राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला होता.

”कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले. डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय!” असं राम कदम यांनी ट्विट केलं होतं.