मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा नागरी सत्कार करण्याचा प्रस्ताव अखेर पालिकेने दहा वर्षे वाट पाहून रद्द केला आहे. गेल्या १० वर्षांत सचिनने सत्कारासाठी पालिकेला वेळ दिला नाही व तसे कळवलेही नाही. त्यामुळे अखेर वाट पाहून मुंबई महापालिकेने सचिनच्या नागरी सत्काराचा प्रस्ताव गुंडाळला आहे.

सचिन तेंडुलकरने  आपल्या २० वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये कसोटीमध्ये ५१ शतके व एकदिवसीय सामन्यात ४९ शतके ठोकत शतकांचे शतक साजरे केले होते. तसेच, सचिनने अष्टपैलू खेळ करून जगभरात अनेक विक्रम नोंदवले. भारताचे कर्णधारपद भूषवले. भारत रत्न‘, ‘राजीव गांधी खेलरत्न‘, पद्मश्री, पद्मविभूषण, अर्जुन, महाराष्ट्र भूषण आदी राष्ट्रीय व राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही जिंकले. सचिनचा मुंबई महापालिकेतर्फे जाहीर नागरी सत्कार करण्याची मागणी २०१० मध्ये एका ठरावाद्वारे करण्यात आली होती. त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात मंजुरी दिली होती. सभागृहातील ठरावानुसार पालिकेने फेब्रुवारी २०१० मध्ये तेंडुलकर यांना तसे पत्र पाठवले होते. तसेच सचिन यांनी त्याबाबत तारीख, वेळ द्यावी, अशी विनंती महापौर व आयुक्तांच्या कार्यालयामार्फत करण्यात आली होती. तेंडुलकर यांनी ठरावाचे पत्र मिळाल्याचे पालिकेला पत्राद्वारे कळवलेही होते. पण त्यात दिनांक व वेळ नमूद करण्यात आली नव्हती.

त्यानंतर ११ डिसेंबर २०११ रोजी त्यांना जाहीर नागरी सत्काराबाबत कळवण्यात आले. परंतु त्याबाबतही तेंडुलकर यांनी महापालिकेला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही ते दिवस व वेळ कळवत नसल्याने पालिकेने सत्काराचा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र पालिका प्रशासनाने सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेत दिले आहे.