टोल नाक्यांमुळे मुंबईकर त्रस्त झालेले असतानाच, कसोटीवीर राज्यसभा सदस्य, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आता टोल संस्कृतीविरुद्ध आवाज उठविल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईच्या टोल संस्कृतीला शिस्त तरी लावा अशी साद तेंडुलकर यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे.
टोलसंदर्भात राज्य सरकार लवकरच वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची ग्वाही या पत्रानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे, वर्षांनुवर्षे केवळ चर्चेतून टोलविला जाणारा टोलचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आल्याचे मानले जात आहे.
मुंबईच्या शेजारी सॅटेलाईट शहरे म्हणून विकसित झालेल्या नवी मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांचे मुंबईशी सातत्याने दळणवळण अपरिहार्य असताना, टोल नाक्यांचे अडथळे वेळकाढू, प्रदूषणकारी आणि अमूल्य इंधनाच्या नाशास कारणीभूत ठरत असल्याचे तेंडुलकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. जगातील अनेक देशांमध्ये टोल आकारणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असून त्यातून वेळ, इंधनाचीही बचत होत असताना, प्रगतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या मुंबईतील टोल नाक्यांना मात्र आधुनिक तंत्राचे वावडे असावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. टोलवसुली आणि तंत्रज्ञानाबाबत मुंबईची जगाच्या तुलनेत होणारी फरफट क्लेशकारक आहे, असा फटकाही तेंडुलकरांनी मारला आहे.